रूफ टॉप सोलरला वीज ग्राहकांची वाढती पसंती, १,३५९ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता गाठली

मुंबई : घराच्या छपरावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून निर्माण झालेली वीज स्वतः वापरायची आणि जास्त निर्मिती झाली तर महावितरणला विकायची या ‘रूफटॉप सोलर’, योजनेला महावितरणच्या ग्राहकांची वाढती पसंती मिळत असून त्यांची राज्यातील संख्या ७६,८०८ इतकी झाली आहे व त्यांच्याकडून एकूण १,३५९ मेगावॅट इतकी विद्युत निर्मिती क्षमता गाठली गेली आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.

राज्यामध्ये पाच वर्षांपूर्वी २०१६ -१७ या आर्थिक वर्षात केवळ १,०७४ ग्राहक २० मेगावॅट सौरऊर्जा रूफ टॉप पद्धतीने निर्माण करत होते. गेल्या पाच वर्षांत त्यामध्ये मोठी वाढ झाली असून एकूण ग्राहकांची संख्या ७६,८०८ झाली आहे तर सौरऊर्जा निर्मितीची क्षमता १,३५९ मेगावॅटवर पोहोचली आहे. २०२१ – २२ या आधीच्या आर्थिक वर्षात राज्यातील ‘रूफ टॉप सोलर’ योजनेत सौरऊर्जा निर्मितीच्या बाबतीत एक हजार मेगावॅटचा टप्पा ओलांडला गेला. त्यानंतर चालू आर्थिक वर्षात एप्रिल महिन्यापासून वाढत्या संख्येने ग्राहक सौरऊर्जा निर्मितीसाठी रूफ टॉप सोलरला पसंती देत आहेत. गेल्या दहा महिन्यात राज्यात घरावर सौर ऊर्जा निर्मिती संच बसविणाऱ्या ग्राहकांची संख्या २०,७२२ ने वाढली आहे तर या प्रकारची सौर ऊर्जा निर्मिती क्षमता ३३१ मेगावॅटने वाढली आहे.

सौरऊर्जा निर्मितीसाठी रूफ टॉप सोलर योजनेत ग्राहकांना केंद्र सरकारकडून मोठे अनुदान मिळते. तीन किलोवॅटपर्यंत क्षमतेचे पॅनेल बसविण्यासाठी सुमारे एक लाख वीस हजार खर्च येतो व त्यामध्ये अंदाजे ४८,००० रुपये म्हणजे चाळीस टक्के अनुदान मिळते. त्यामुळे ग्राहकाला जवळपास ७२,००० रुपये खर्च येतो. सौरऊर्जेतून निर्माण होणाऱ्या वीजेमुळे ग्राहकाला नेहमीचा वीजपुरवठा कमी वापरावा लागतो व वीजबिलात कपात होते. ग्राहकाच्या सौर पॅनेलमधून त्याच्या वापरापेक्षा जास्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणच्या ग्रीडमध्ये पाठवली जाते व कंपनी त्या विजेच्या मोबदल्यात वीजबिलात सवलत देते. यातून कधी कधी ग्राहकांना शून्य रकमेचे वीजबिलही येते. सोलर पॅनेल बसविण्याचा खर्च चार ते पाच वर्षांत भरून निघतो पण त्यांचा उपयोग पंचवीस वर्षे होत राहतो. यामुळे ही योजना लोकप्रिय झाली आहे.

सौर ऊर्जा निर्मितीसाठी ग्राहकांनी ३ किलोवॅट ते दहा किलोवॅट क्षमतेचे पॅनेल्स बसविले तर वीस टक्के अनुदान मिळते. घरगुती ग्राहकांना सुविधा हे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे. तथापि औद्योगिक ग्राहकही रुफ टॉप सोलर पद्धतीने वीजनिर्मिती करत आहेत. सौर ऊर्जानिर्मितीसाठी पॅनेल बसवू इच्छिणाऱ्या ग्राहकांना महावितरणच्या महाडिस्कॉम डॉट इन / आयस्मार्ट या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा असतो. पॅनेल बसविणाऱ्या एजन्सीसह सर्व बाबतीत महावितरणची मदत मिळते. सौर ऊर्जेमुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते तसेच ग्राहकांना आर्थिक लाभ होतो.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

'ऐ मेरे प्यारे वतन' ने श्रोताओं को देशभक्ति की भावनाओं से सराबोर किया, नागपुर पुलिस की विशेष प्रस्तुति

Mon Jan 30 , 2023
नागपुर :- गीतों में भावनाओं को जगाने की ताकत होती है. सोनेगांव मंडल नागपुर के एसीपी अशोक बागुल ने ‘ऐ मेरे प्यारे वतन’ गीत की प्रस्तुति देकर दर्शकों को देशभक्ति की भावना से सराबोर कर दिया। सांस्कृतिक समारोह लॉन दाभा चौक में गणतंत्र दिवस पर यूथ वेलफेयर एसोसिएशन के सचिव एवं गायक-आयोजक मनीष पाटिल द्वारा प्रस्तुत संगीतमय कार्यक्रम ‘हैप्पी रिपब्लिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!