पुणे :- दलित, मागासवर्गीयांमध्ये फूट पाडून, त्यांना परस्परांशी संघर्ष करावयास लावून त्यांचे आरक्षण हिसकावून घेण्याचा काँग्रेस व महाविकास आघाडीचा कट असून महाराष्ट्राची जनता हा कट राज्यात यशस्वी होऊ देणार नाही. केवळ विकास आणि जनहिताच्या मुद्द्यास प्राधान्य देणाऱ्या महायुतीला पुन्हा एकदा संधी देऊन महाराष्ट्राला देशाच्या प्रगतीचा आधार बनविण्यासाठी एक व्हा, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे येथे महायुतीच्या उमेदवारांकरिता आयोजित प्रचार सभेत बोलताना मंगळवारी दिला. या सभेला व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपा महानगराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादीचे दीपक मानकर व महायुतीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
आपल्या सुमारे अर्धा तासाच्या भाषणात मोदी यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षांत केलेल्या अनेक जनहितकारी योजनांचा पूर्ण तपशीलच सादर केला. काँग्रेसने अनेक दशके दुर्लक्षित ठेवलेल्या महाराष्ट्रातील सांस्कृतिकतेचे संरक्षण व प्रसारासाठी महायुती सरकारने पावले उचलली आहेत, असे सांगून, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची अनेक दशकांची मराठीजनांची मागणी आमच्या सरकारने पूर्ण केली आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्राचा वारसा सुरक्षित करण्यासाठी सावित्रीबाईंचे स्मारक, धर्मवीर संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावरील स्मारक, संत जगनाडे महाराजांचे स्मारक, क्रांतिगुरु लहूजी साळवे संग्रहालय, अशा वर्षांनुवर्षे रखडलेल्या मागण्यांकडे विदेशी मानसिकतेच्या काँग्रेसने केवळ द्वेषापायी दुर्लक्ष केले, असा आरोपही मोदी यांनी केला. हेच लोक सावरकरांना दूषणे देतात, बाळासाहेब ठाकरे यांची स्तुती करताना त्यांच्या जिभांना कुलपे लागतात.
आघाडीवाल्यांची हिंमत असेल तर युवराजांच्या मुखातून सावरकरांच्या व बाळासाहेबांच्या स्तुतीचे शब्द उच्चारण्यास भाग पाडावे, असे आव्हानही मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेखदेखील न करता दिले. काँग्रेस व महाविकास आघाडीकडे नीती नाही, नियत नाही आणि नैतिकताही नाही. त्यांना केवळ सत्ता पाहिजे. त्यासाठी त्यांनी देशाची फाळणी केली, सत्तेसाठी अनुनयाचा धोकादायक डाव रचला आणि आता सत्तेसाठी दलित, मागासवर्गीयांमध्ये संघर्ष माजवून परस्परांमध्ये फूट पाडण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. या वर्गांना कमजोर करून त्यांचे आरक्षण काढून घेण्याचा काँग्रेसचा डाव आहे. म्हणून, ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ असा इशारा देत तशी घोषणाच उपस्थितांकडून वदवून घेत मोदी यांनी महाराष्ट्राला सुरक्षिततेचा कानमंत्र दिला.
आपल्या भाषणात मोदी यांनी पुण्याच्या विकासाकरिता केलेल्या कामांची माहितीही दिली. येथील आयटी उद्योगामुळे पुण्याच्या उद्यमशील युवकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या, ऑटोमोबाईल उद्योगामुळे संधी वाढल्या. पुण्याला चहुबाजूंनी जोडण्यासाठी महायुती सरकार गांभीर्याने काम करत आहे, असे सांगून ते म्हणाले, तुमच्या आकांक्षा या माझ्यासाठी आदेश आहेत. तुमची स्वप्ने ही माझ्यासाठी कामाची प्रेरणा आहे. तुमच्या गरजा या माझ्या सरकारच्या योजनांचा आधार आहे. तुमचे जगणे सोपे व्हावे याला माझे, महायुतीचे प्राधान्य आहे. यासाठी पुण्यात आज मेट्रो सेवेचा सातत्याने विस्तार होत आहे. वाहतुकीचा वेग वाढवून नव्या शक्यतांना नवी भरारी मारण्याची संधी देणे हा आमचा संकल्प आहे. यासाठी इन्फ्रास्ट्रकचर व इंटरसिटी या दोन्हीवर काम करत आहोत. मिसिंग लिंकसाठी साडेसहा हजार कोटी, रिंग रोडसाठी साडेदहा हजार कोटी रु. खर्च केले जातील. पुणे हे 21 व्या शतकातील सर्वात मोठे शहर होणार आहे. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर पालखी मार्गाचे काम 11 हजार कोटी खर्चून वेगाने पूर्ण होत असून वारकऱ्यांसाठी ही आमची समर्पित सेवा आहे, असे उद्गार मोदी यांनी काढले.
महाराष्ट्रात विकास कामाची गती अभूतपूर्व आहे. महायुतीच्या आधी महाराष्ट्रात ज्यांचे सरकार होते, त्यांच्याकडे तुम्हाला सांगण्यासाठी एक काम नाही. आघाडीची अडीच वर्षे आमच्या प्रकल्पांना स्थगिती देण्यातच खर्च झाली. काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांची ही संस्कृती आहे. म्हणूनच, महायुती हाच विकासाचा एकच पर्याय, आणि महायुतीचे सरकार आवश्यक आहे, असे ते म्हणाले. महायुती आहे तरच गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे, असा विश्वासपूर्ण दावा त्यांनी केला.
कर्नाटकात काँग्रेसकडून जनतेची लूट
आज महाराष्ट्राची जनता काँग्रेसी कर्तबगारीचा काळा काळ कर्नाटकात पाहात आहे. भरभरून आश्वासने दिली, सरकार आले तेव्हा त्यांनी काखा वर केल्या आणि आश्वासने पूर्ण करण्याऐवजी जनतेकडूनच वसुली सुरू कली आहे. दररोज काही काही घोटाळे समोर येत आहेत, जनतेची खुलेआम लूट होत आहे. हाच पैसा महाराष्ट्रात निवडणुकांसाठी वापरला जात असल्याचा आरोप होत आहे. महाराष्ट्राला वाचवायचे असेल तर काँग्रेस नावाची ही आपत्ती लांब ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले. आज संपूर्ण देश काँग्रेसी विश्वासघाताचा नमुना अनुभवत आहे. जम्मू काश्मीर विधानसभेत कलम 370 पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव संमत केला आहे. हे लोक संविधानाच्या नावाने कोऱ्या कागदांची पुस्तके महाराष्ट्रात उंचावतात, असा आरोप करून, बाबासाहेबांचे संविधान काँग्रेसने संपूर्ण देशात का लागू केले नाही, असा सवालही त्यांनी केला. सहा-सात दशकांपासून जम्मू काश्मीरात भारताचे संविधान लागू नव्हते. मोदींना जनतेने सेवेची संधी दिली, आणि तिकडे बाबासाहेबांचे संविधान लागू झाले. 370 ची भिंत उभी करून त्यांनी बाबासाहेबांचे संविधान कश्मीरमध्ये रोखले. आता आम्ही कलम 370 ला गाडून टाकले आहे. कश्मीरला भारतापासून तोडणारे, आतंकवाद आणि विभाजनवादाला खतपाणी घालणारे, भारताचे संविधान रोखणारे हे कलम गाडून काश्मीरमध्ये तिरंगा फडकातो आहे. विभाजनवाद्यांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत, आणि काश्मीरमध्ये लाल चौकात तिरंगा दिमाखात फडकत आहे. लोक आनंदात दिवाळी साजरी करताहेत. पण काँग्रेस आणि त्यांचे साथीदार पुन्हा 370 कलम लागू करण्यासाठी विधानसभेत ठराव करत आहेत, असे ते म्हणाले.
कलम 370 विरोधात पुणेकर सरसावले…
काश्मीरमध्ये पुन्हा 370 लागू करण्याची भाषा कोणाची आहे, याचा जाब विचारला पाहिजे. ही पाकिस्तानची भाषा आहे, आणि आज तीच भाषा काँग्रेस व त्यांचे साथीदार बोलत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. कलम 370 पुन्हा लागू करण्याचा काँग्रेसचा खतरनाक खेळ हाणून पाडून त्यांना धडा शिकविण्यासाठी मोबाईलचे फ्लॅश लाईट सुरू करण्याचे आवाहन मोदींनी केले, आणि सभेत हजारो मोबाईलच्या फ्लॅश झळकल्या.
मध्यमवर्गाच्या हितासाठी…
भाजपा-रालोआ सरकारने नेहमीच मध्यमवर्गीयांना प्राधान्य दिले. हाच वर्ग देशाचा कणा असतो. हाच वर्ग संपत्ती निर्माण करतो. आज भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनत आहे, त्यात मोठा वाटा मध्यमवर्गाचाच आहे. मध्यमवर्गाची प्रगती होते, तेव्हा देशाची प्रगती होते. म्हणून मध्यमवर्गाच्या हिताचे निर्णय घेऊन धोरणे आखली, असे सांगून मोदी यांनी विविध योजनांची माहितीही दिली. आयकर सवलत, व्हॅटमध्ये कपात यांचा फायदा मध्यमवर्गीयांना मिळाला आहे. उपचाराच्या खर्चात बचत व्हावी म्हणून मध्यमवर्गीयांना दिलेल्या सवलतीमुळे 30 हजार कोटींची बचत झाली आहे. हार्ट स्टेन्ट स्वस्त झाल्यामुळे 85 हजार कोटींची मध्यमवर्गीयांची बचत झाली. आयुष्मान योजनेमुळे 70 वर्षांवरील मध्यमवर्गीयांना मोठ्या प्रमाणात झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात दिलेली ही गॅरंटी आम्ही पूर्ण केली आहे. आमचे सरकार गरीबांकरिता पक्की घरे देतच आहे, मध्यमवर्गीयांच्या घरांनाही सबसिडी दिली आहे. पीएम विद्यालक्ष्मी योजनेद्वारे उच्च शिक्षणासाठी युवकांना विनातारण 10 लाखांपर्यंतचे स्वस्त कर्ज दिले जाणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी गेल्या दहा वर्षात एक लाख नव्या जागा वाढविल्या असून येत्या पाच वर्षात आणखी 75 हजार जागा वाढविल्या जाणार असून मध्यमवर्गीयांच्या युवकांना देशाबाहेर जाण्याची गरज राहणार नाही. स्पेस स्टार्टअपसाठी एक हजार कोटींचा विशेष निधी तरतूद केली आहे. नोकऱ्यांसांठी विशेष पॅकेज तरतूद केली आहे. मोठ्या कंपन्यात इन्टर्नशिप योजना सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.