– दक्षिण नागपुरातील इंडिया आघाडीची सभा “हाऊसफुल”
नागपूर :- भारतीय जनता पक्षाचे उमेदवार स्वतःला व्यापारी म्हणतात. उद्योगपती मित्रांचे कर्ज माफ करण्यासाठी सामान्य जनतेला लुटण्याचे काम भाजप करीत आहे. असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केला. दिल्लीला व्यापारी पाठवावा की जनतेचा सेवक हे नागरिकांनी ठरववावे असे आवाहन यावेळी पटोले यांनी केले. इंडिया आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारार्थ ताजबाग, रघुजीनगर येथे जनसभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी, चंद्रकांत हांडोरे, अभिजीत वंजारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सलील देशमुख, शेखर सावरबांधे, दीनानाथ पडोळे, अशोक धवड, गिरीश पांडव, विशाल मुत्तेमवार, अतुल लोंढे, संजय महाकाळकर, किशोर कुमेरिया, दूनेश्वर पेठे, प्रशांत धवड, वजाहत मिर्झा यांची प्रमुख उपस्थिती होती.
जनता उतरवणार सत्ताधाऱ्यांचा माज – मुत्तेमवार
सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज चढला आहे. मनमानी पद्धतीने जनतेची लुट करुन देशाची एकात्मता संपविण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. सत्तेचा हा माज जनताच १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान करुन उतरविणार असल्याचा विश्वास माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तमेवार यांनी व्यक्त केला.
उत्तर नागपुरातील जनतेचा निर्धार; अहंकारी सरकारचा करणार पायउतार
केंद्रातील भाजप सरकार अहंकारी झाली असून मनमानी निर्णय घेण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. त्यामुळे जनसामान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन आभासी भौतिक विकासाचे चित्र रंगविण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे, जनतेला हे समजले असून आता अहंकारी सरकारचे पायउतार केल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा निर्धार उत्तर नागपुरातील जनतेने केला आहे. जन आशीर्वाद यात्रेनिमित्त गुरुवारी इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांनी उत्तर नागपुरातील नागरिकांशी संवाद साधला तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यात्रेची सरुवात मोतीबाग येथील कला मंदिर सभागृह येथून झाली होती तसेच पूर्ण उत्तर नागपूरच्या प्रत्येक गल्लीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय मार्गे यादव नगर येथे गुरुवारच्या यात्रेचा समारोप झाला.