पुणे भाजपा धोक्यात पवार काका पुतणे जोमात !

पुणे – इजा बिजा ताजा, तिघेही भाजपाचे, विचित्र योगायोग दुर्दैवी योग विशेष म्हणजे तिघेही लागोपाठ तेही कर्करोगाचे शिकार होऊन अकाली गेले, मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप दोघेही भाजपा आमदार दोघेही अकाली, फार लवकर गेले, लक्ष्मण जगताप मुक्ता टिळक आणि खासदार गिरीश बापट या तिघांच्याही जाण्याने त्यांच्या व्यक्तिगत कुटुंबाचे जेवढे नुकसान झाले त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने पुण्याचे,पुणे जिल्ह्याचे विशेषतः भारतीय जनता पक्षाचे मोठे नुकसान झाले, त्यांच्या या विचित्र आणि अकाली जाण्याने पुणे आणि महाराष्ट्र देखील हादरले. जगताप, टिळक आणि बापट यांच्या जागी त्यांच्या तोडीचे ताकदीचे नेते लगेच पुन्हा तातडीने उभे करणे भाजपाला ते पटकन झटक्यात शक्य नाही तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असेल किंवा भाजपाला पुणे जिल्ह्यात त्यामुळे मोठे नुकसान होण्याची मोठी शक्यता आहे त्याची झलक त्यांना मुक्ता टिळक यांच्या रिक्त जागी झालेल्या पोट निवडणुकीत बघायला मिळाली. या तीन नेत्यांच्या जाण्याने भाजपाला त्यांच्या वरिष्ठांना तातडीने खूप लक्ष घालावे लागणार आहे अन्यथा पुणे जिल्ह्यात भाजपा, चुकीचे उमेदवार पुढे पुनः लादल्या गेल्यास झपाट्याने मागे येईल आणि पुणे जिल्हा हातातून जाणे त्यातून मोठी झळ भाजपाला यासाठी बसू शकते कि महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबातून कोणीतरी पुण्यात राहायला असतो जो आपल्या घरी पुण्यातल्या भाजपा पीछेहाटीचा वृत्तांत कुटुंबात पसरवून जर मोकळा झाला तर त्याचे विपरीत परिणाम नक्की राज्यातल्या भाजपावर होऊ शकेल म्हणूनच भाजपच्या वरिष्ठ चाणक्यांनी आणि त्यांच्या पाठीशी एखाद्या गुप्तहेरांसारखे कायम उभे असलेल्या रा. स्व. संघाच्या साऱ्याच पदाधिकाऱ्यांनी प्रचारकांनी वरिष्ठांनी नजीकचा काही काळ भाजपा आणि राजकारणाच्या बाबतीत अतिशय संवेदनशील जागरूक फटकळ आक्रमक असलेल्या पुणेकरांना मोठ्या विश्वासात घेऊन सध्याची हि विस्कटलेली मोठी घडी बसविण्या तेथे ठाण मांडून बसणे मोठ्या गरजेचे आहे, अर्थात मला विशेषतः शरद पवार आणि अजित पवार हे ज्या पद्धतीने तेथे लक्ष घालून मोठ्या खुबीने भाजपाला अडचणीत आणताहेत डोकेदुखी ठरताहेत त्याचीनेमकी माहिती असल्याने त्याचवेळी तीन तीन प्रभावी भाजपा नेत्यांचा तेही आमदार आणि खासदार असलेल्या नेत्यांचा अचानक मृत्यू आणि पुणे जिल्ह्यातील भाजपा नेत्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये माजलेली बंडाळी पसरलेले झालेले मोठे मतभेद, मिस्टर फडणवीस ताबडतोब लक्ष घाला आणि हातातून निसटू पाहणारा पुणे जिल्हा, पुन्हा एकदा भाजपाचा बालेकिल्ला हे चित्र निर्माण करा…

हिंदू म्हणण्यापेक्षा जातीचा आधार घेत विशेषतः पवार काका पुतणे पुणे जिल्ह्यातील समस्त ब्राम्हणेतर मंडळींना मतदारांना विशेषतः काही भडक डोक्याच्या तरुणांना मोठ्या खुबीने युक्तीने

भाजपाविषयी सतत विष कालवून त्यांना भाजपापासून दूर नेण्यात बऱ्यापैकी यशस्वी ठरले आहेत आणि पवार काका पुतण्याचा हा फोडाफोडीचा वेग जर असाच आजच्यासारखा कायम टिकला तर पुणे जिल्ह्यात कधी काळी संघ भाजपाचे महत्व होते आणि त्यांचे आमदार खासदार सतत सहज निवडून यायचे हे देखील स्थानिक पुणेकर विसरून जातील कारण पवार काका पुतणे संघ भाजपा पद्धतीने सतत बैठका त्यात जसा नेत्यांचा सहभाग तसा सरकारी अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा देखील संचार आणि सहभाग, नक्की सांगतो भाजपाच्या पायाखालची वाळू येथे सरकली असून त्याचा मोठा फायदा शरद पवार आणि त्यांच्या मित्रपक्षांना होतो आहे आणि हीच वस्तुस्थिती आहे. भाजपाचे देऊळ नक्की पाण्यात आहे…

साधारणतः 1995 नंतरचा तो काळ असावा, मला नेमके साल आठवत नाही पण एक दिवस मला गिरीश बापट यांनी अचानक विधान भवनात बोलावून घेतले आणि माझ्या हातावर दहा हजार रुपयांचा चेक ठेवत ते म्हणाले, तुझी धडपड तुझा लढा तुझी आक्रमक पत्रकारिता सारे काही मला मनापासून आवडते म्हणून तुला हि छोटीशी बक्षिशी. त्याचक्षणी पुण्यातला तेही कोकणस्थ ब्राम्हण, हि जी काही व्याख्या माझ्या मनात होती, क्षणार्धात मी खजील झालो आणि त्यांचे हात धरून त्यांना मनापासून धन्यवाद दिले. अर्थात त्यांच्या मैत्रीच्या नंतर अशा कितीततरी आठवणी. एक मनमोकळा नेता, कायम जमिनीवर असणारा बोलका अभ्यासू नेता कायमचा आपल्यातून गेला, अगदी मनापासून वाईट वाटले. किमान बापट जिवंत असते तर त्यांनी नक्की टिळक आणि जगताप यांची उणीव यावयातही भरून काढली असती पण पुणे जिल्ह्यात भाजपाला कोणा दुष्टाची नजर लागली, संघ व भाजपाने लक्ष घालावे…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

@फाईलफोटो

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com