‘मतदार जागरूकता कार्यक्रमास’ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Ø जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी युवा मतदारांकडून घेतले वचन

Ø ‘हाऊज द जोश, हाय मॅडम’, युवा मतदारांचा जोशपूर्ण प्रतिसाद

नागपूर :- लोकसभा निवडणुकीसाठी प्रथमच मतदानाचा अधिकार बजावण्यास उत्सुक असणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कर्तव्यासाठी साद घातली. त्यांनी केलेल्या आवाहनाला नव मतदारांनी एका हातात मोबाईलचा टॉर्च व डाव्या हाताचे बोट उंचावून मतदान करण्याचे वचन दिले. युवकांच्या या जोशपूर्ण सकारात्मक सहभागाने सुरेश भट सभागृह निनादून गेले.

जिल्हा निवडणूक कार्यालय, महानगरपालिका आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आज सुरेश भट सभागृहात युवा मतदार जागरुकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. विपीन इटनकर, सौम्या शर्मा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, मनपाचे सहायक आयुक्त् महेश धनेचा, उपायुक्त मिलिंद मेश्राम यांच्यासह विद्यापीठाचे सिनेट सदस्य, व्यवस्थापन सदस्य उपस्थित होते.

डॉ. इटनकर म्हणाले, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रथमच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्ज असणारे नागपूर जिल्ह्यातील नव मतदार हे मतदार जागरुकता कार्यक्रमाचे खरे अँबेसेडर आहेत. आपल्या कृतीशील सहभागातून ते आपले कुटुंब, कॉलनी, परिसरात मतदार जागरुकता घडवून आणतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हा प्रशासनाने ‘मिशन युवा’ यशस्वीपणे राबवून १७ ते १९ वयोगटातील दीड लाख मतदारांची नोंदणी केली असून जिल्ह्यात ७५ टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवून आखलेले ‘मिशन डिस्टींक्शन’ यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करत युवा मतदारांची यात महत्वाची भूमिका असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. येत्या १९ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या नागपूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या विविध सोई सुविधांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

लोकसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन नव मतदारांना लोकशाहीच्या पर्वात सहभागी होण्याची मोठी संधी उपलब्ध होत असल्याचे सौम्या शर्मा यांनी सांगितले. लोकसभा निवडणूक प्रक्रियेची माहिती देतांना पुरुषांच्या बरोबरीने महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी नव मतदार विद्यार्थीनींनी आपल्या परिसरात जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘आय ॲम प्राऊड वोटर’ हा हॅशटॅग वापरुन विविध समाज माध्यमांवर रील मेकींग कॉम्पीटिशनच्या माध्यमातून नव मतदारांनी सहभागी व्हावे असे त्यांनी आवाहन केले. ज्या महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने मतदान करतील त्या महाविद्यालयांना गौरविण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. मतदान नोंदणी व आपल्या मतदान केंद्राची माहिती मिळविण्यासाठी https://votesr.eci.gov.in या संकेतस्थळासोबतच Voter Helpline Aap विषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.

महेश धनेचा यांनी मनपाच्यावतीने लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याकरिता उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या व्हिलचेअर्स, जेष्ठ मतदारांसाठी वाहन व्यवस्था आदींची माहिती दिली. डॉ.प्रशांत बोकारे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना लोकसभा निवडणुकीतील मतदानाची संधी सोडू नका, असे आवाहन केले.

खेलो इंडिया विद्यापीठ गेम्समध्ये रोप्य पदक पटकविणारी ॲथलिट्स नेहा ढबाले हीने उपस्थितांना मतदानात सहभागी होण्याची प्रतिज्ञा दिली. मॅट्रीस वॉरियर्सच्यावतीने ‘एक वोटसे क्या फरक पडता है’ हे पथनाट्य सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘अधिकार है’ या ध्वनीचित्रफितीचा टिझर तसेच भारत निवडणूक आयोगाकडून मतदार जागरुकतेसाठी तयार करण्यात आलेले ‘मै भारत हू, भारत है मुझमे….’ हे विशेष गीत यावेळी प्रदर्शीत करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालये, एनएसएस,एनसीसी, विद्यापीठ क्रीडा प्राधिकरण, विद्यार्थी विकास कल्याण समितीचे विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुंबईतील उबाठा गटातील अनेक उपशाखा प्रमुख, गटप्रमुखांचा भाजपा मध्ये प्रवेश

Fri Apr 5 , 2024
– उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याने कार्यकर्त्यांची घुसमट   – मुंबई भाजपा अध्यक्ष आ.आशीष शेलार यांची टीका मुंबई :- उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याने सामान्य कार्यकर्त्यांची घुसमट होत असल्याने हे कार्यकर्ते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत, असे मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशीष शेलार यांनी शुक्रवारी सांगितले. चेंबूर व गोवंडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उबाठा गटातील उपशाखा प्रमुख, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com