संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कमसरी बाजार परिसरातील कामठी कन्हान मार्गावर हिट अँड रण अंतर्गत एका काळ्या रंगाच्या भरधाव कारचालकाने समोरील दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत प्रबुद्ध नगर रहिवासी पाच वर्षोय आलिशाचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 25 मार्च 2024 ला दिवसाढवळ्या होळीच्या दिवशी घडली असता या घटनेला दोन महिन्याचा कालावधी लोटून गेला तरी हायटेक असलेल्या पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यात अपयश येत असून या घटनेतील आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत एकंदरीत या हिट अँड रण प्रकरणात आरोपीचा शोध लावण्यात जुनी कामठी पोलिस विभाग नापास ठरत असल्याने या प्रकरणातील आरोपीचा लवकरात लवकर शोध न लावल्यास पोलीस प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचा ईशारा कामठी नगर परिषद चे माजी अध्यक्ष प्रमोद उर्फ गुड्डू मानवटकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.
मृतक आलिशाचे वडील राजेश भीमराव डहाट हे आपली पत्नी भाग्यश्री, मुलगा द्रोवील (10) व मुलगी आलिशा (5) यांना मोटर सायकलने कामठी कन्हान महामार्गाने देवलापार कडे होळीच्या दिवशी 25 मार्च 24 रोजी जात असताना सफर दुचाकीला मागेहून निष्काळजीपणाने बेधुंद येणाऱ्या काळ्या रंगाच्या भरधाव कार ने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांची पाच वर्षाची आलिशा नावाची मुलगी गंभीर जखमी झाल्याने तिला चौधरी हॉस्पिटल, आशा हॉस्पिटल व नंतर तिथून मेयो हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आल्यावर तिला मृत घोषित करण्यात आले.
घटनास्थळ हे कमसरी बाजार रोड कंटोंमेंट चेकपोस्ट जवळ असल्याने त्या परिसरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत. तरीसुद्धा पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यात अपयश प्राप्त होते तर या प्रकरणात आरोपीचा शोध बाबत विचारणा केली असता पोलिसांकडून फक्त आश्वासनाची खैरात देण्यात येते यावरून स्थानिक जुनी कामठी पोलिस विभाग या प्रकारणाला गांभीर्याने न घेता अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे.ज्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर व कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.तेव्हा मृतक आलिशाच्या कुटुंबियांसह प्रबुद्ध नगर च्या शोकाकुल नागरिकांच्या रागाचा अंत न पाहता लवकरात लवकर आरोपीचा शोध लावून न्याय मिळवून द्यावा अन्यथा पोलीस प्रशासन विरोधात तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल असा ईशारा माजी नगराध्यक्ष गुड्डू मानवटकर यांनी शोकाकुल राजेश दहाट कुटुंबियसह समस्त शोकाकुल नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.