छठ पूजा व्यवस्था कार्याचे भूमिपूजन
नागपूर :- उत्तर भारतासह सर्व देशात छठपूजेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, या धार्मिक उत्सवानिमित्य नागपुरातही शेकडो भाविक सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करण्यासाठी अंबाझरी आणि फुटाळा तलाव येथे मोठ्या संख्येने एकत्र येतात. यंदा ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. भाविकांना सर्वतोपरी सुविधा पुरविण्यासाठी नागपूर महानगरपालिका पूर्णतः सज्ज झाली असून, मनपाद्वारे भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा आणि व्यवस्था कार्याचे भूमिपूजन धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांच्या हस्ते आज (ता. २८) रोजी करण्यात आले.
याप्रसंगी माजी महापौर दयाशंकर तिवारी, नागपूर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता विजय गुरुबक्षणी यांच्यासह मनपाचे कर्मचारी व विविध संस्थांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
छठपूजेमध्ये सूर्यदेवाची पूजा केली जाते, सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्यासाठी दरवर्षी शेकडो भाविक अंबाझरी तलाव आणि फुटाळा तलाव येथे एकत्रित येतात. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही छठ पूजेच्या निमित्ताने भाविकांसाठी विविध सुविधा पुरविण्यात येत आहेत. भाविकांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने तलाव परिसरात बॅरिकेटिंग करण्यात आली आहे. याशिवाय संपूर्ण परिसरात विद्युत व्यवस्था करण्यात येणार आहे. सार्वजनिक सूचना देण्यासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा, एक स्वागत कक्ष, भाविकांच्या पूजा व्यवस्थेसाठी सुरक्षित अस्थायी घाटांची निर्मिती केल्या जात आहे. याकार्याचे भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी सर्वश्री एस.पी. सिंह, प्रा. बद्रीप्रसाद पाण्डेय, ब्रजभूषण शुक्ला, अशोककुमार शुक्ला, अजय गौर, विक्रम खुराना, सुधीर श्रीवास्तव, अनिल बावनगडे, कौशल पाठक, सचिन शुक्ला, प्रवीण झा, संजय पाण्डेय, रामनंद झा. राजेश तिवारी, सौरव झा, मुकेश मिश्रा, सुरेंद्र झा, अमित झा, मनोज चौधरी, ब्रिजेश मिश्रा, भागवत पाण्डेय, पंकज दुबे आदी उपस्थित होते.
अग्निशमन विभागाची आपत्कालीन व्यवस्था
येत्या ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी शेकडो भाविक सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करण्यासाठी अंबाझरी आणि फुटाळा तलावावर येणार आहेत. छठ पूजेच्या दिवशी पहाटे तलावावर भाविकांची गर्दी होणार असल्यामुळे आवश्यक ती प्रकाशव्यवस्था नागपूर महानगरपालिकातर्फे करण्यात येणार आहे. तसेच कुठल्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी अग्निशमन विभागाची आपात्कालिन यंत्रणा तसेच तैराक तत्पर राहणार असून, दोन्ही ठिकाणी मनपाच्या आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिका तैनात असणार आहेत.