मुंबई :- राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्या सोडवण्याकरिता मा. वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे बैठक पार पडली.
या बैठकीला यंत्रमाग समितीच्या समितीचा सदस्य म्हणून आमदार प्रवीण दटके यांनी उपस्थित राहून यंत्रमाग धारक तसेच कामगारांच्या विविध समस्या बैठकीदरम्यान मांडल्या.
1. वस्त्रोद्योग विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व क्षेत्रातील कामगारांच्या जीवनाला नवसंजीवनी देण्याकरिता वस्त्रोद्योग कामगार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी आणि त्यामाध्यमातून कामगारांच्या कुटुंबाकरिता कल्याणकारी योजना राबवाव्या.
2. नागपुरात असणाऱ्या इम्प्रेस मिलच्या 35 हजार स्क्वेअर फुट जागेवर मिनी टेक्सटाइल पार्क उभा करावा ज्यामध्ये पॉवरलूम हबचा समावेश असेल.
3. यंत्रमानधारकांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने 27 एचपी ते 201 एचपी या प्रवर्गातील यंत्रमाग धारकांसाठी प्रति युनिट रुपये 0.75 इतकी वीज सवलत देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी करावी तसेच यंत्रमाग धारकांना प्रति युनिट 1 रु याप्रमाणे विशेष अनुदान म्हणून वीज सवलत द्यावी.
4. राज्यात वस्त्रोद्योग बहुल भागात विशेषतः नागपुरात वस्त्रोद्योग तंत्रनिकेतन आणि इंजीनियरिंग संस्था तसेच कौशल्य विकास योजना चालू कराव्यात जेणेकरून या भागातील तरुण पिढी वस्त्रोद्योग क्षेत्राकडे आकर्षित होईल.
5. यासोबतच एक कॉमन शेडमध्ये मल्टी पार्टी मीटर कनेक्शन साठी परवानगी देण्यात यावी, यंत्रमागाकरिता वीज दर सवलत योजनेअंतर्गत ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी अर्ज करण्याच्या पद्धतीत सुधार करून सोप्या पद्धतीत अर्ज उपलब्ध करून देण्यात यावा, यंत्रमाग धारकांना 5% व्याज अनुदान योजना सुरू करून प्रलंबित असणारी रक्कम त्वरित वितरित करावी अशा यंत्रमाग धारकांच्या व कामगारांच्या विविध मागण्या आमदार प्रवीण दटके यांनी बैठकीत मांडल्या.
या सर्व मागण्यांना तत्वतः मंजुरी देत आगामी कॅबिनेट बैठकीत सदर विषय शासन स्तरावर घेऊन तातडीने मंजुरी देण्यात येईल असे आश्वासन मा. वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील तसेच वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख मंत्री दादा भुसे यांनी दिले. यावेळी समितीचे सदस्य आमदार व अधिकारी बैठकीस उपस्थित होते.