यवतमाळ :- यवतमाळ डाक फोरमची सभा मुख्य डाकघर येथे आयोजित करण्यातत आली होती. या सभेत डाक विभागातर्फे डाकघर अधिक्षक गजेंद्र जाधव, प्रधान डाकपाल किशोर निनावे, जनसंपर्क निरीक्षक सुनिल रोहनकर उपस्थित होते.
फोरमच्या सभेला ग्राहकांचे प्रतिनिधी म्हणून फोरम सदस्य डॉ. योगेंद्र मारू, डॉ. श्रीधर देशपांडे, ॲड. महेंद्र ठाकरे आणि प्रशांत सावळकर तसेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्यावतीने शाखा व्यवस्थापक चित्रसेन बोदेले, सहायक व्यवस्थापक अमोल रंगारी उपस्थित होते. या सभेत डाक विभागाच्या विविध सेवा प्रभाविपणे राबविण्याच्यादृष्टीने उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. ग्राहक प्रतिनिधींच्या सूचना व मार्गदर्शन घेण्यात आले.
यावेळी बालिका दिनाचे औचित्य साधून राबविण्यात आलेल्या घरोघरी सुकन्या समृद्धी योजना उपक्रमांतर्गत बालिकांना सुकन्या खाते पुस्तिका मान्यवरांच्याहस्ते प्रदान करण्यात आले. डाक फोरमच्या माध्यमातून ग्राहकांच्या गरजा व समस्या समजून घेत डाकसेवेला अधिक लोकाभिमुख करण्याचा डाक विभागाचा मानस आहे, असे डाकघर अधिक्षक गजेंद्र जाधव यांनी कळविले आहे.