– हलबा समाजातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव
नागपूर :- हलबा समाजातील तरुणांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास व्हावा, यादृष्टीने कोलबास्वामी फाउंडेशनकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. समाजाला योग्य दृष्टी देण्याचे काम फाउंडेशन करीत आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) काढले. कोलबास्वामी फाउंडेशनच्या वतीने हलबा समाजातील दहावी व बारावीच्या गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे, चंद्रशेखर नगरधनकर, पौनिकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. ना. गडकरी यांनी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निरंतर प्रयत्न होत असल्याबद्दल फाउंडेशनचे कौतुक केले तसेच तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण सदैव पाठिशी असल्याचा विश्वास दिला. ते म्हणाले, ‘मुलांना चांगले शिक्षण मिळाले तर ते चांगले नागरिक होतील. जो समाज सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असतो त्या समाजातील तरुणांना प्रोत्साहन दिले तर तेही डॉक्टर, इंजिनियर, वकील, आयएएस, आयपीएस होऊ शकतात. त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी मदत करण्याचे काम होत आहे, याचा आनंद आहे.’ ‘मी स्वतः दरवर्षी अशा समाजातील तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी पंधरा ते वीस लाख रुपयांचे सहकार्य करतो. कारण नवीन पिढीमध्ये चांगला नागरिक होण्याची भावना निर्माण होणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक झाले, यशाला प्रोत्साहन दिले तर त्यांना नक्कीच योग्य दिशा सापडते. समाजासाठी काहीतरी करण्याची भावना त्यांच्यात निर्माण होत असते,’ असेही ना. गडकरी म्हणाले. यावेळी त्यांनी श्री संत कोलबास्वामी यांच्या योगदानाचा आणि धापेवाडा येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिराचा आवर्जून उल्लेख केला. समाजातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल ना. गडकरी यांनी नगरधनकर आणि पौनिकर यांचे कौतुक केले.