नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर इतिहास विभागात एमए प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. एमए प्रथम वर्षाच्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करणे इतिहास विभागाची दीर्घ परंपरा राहिलेली आहे.सीनियर विद्यार्थ्यांकडून प्रवेशित नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत होत असते.
नवीन विद्यार्थ्यांना विभागातील वातावरणाशी सहजरीत्या जुळले जावे. सीनियर विद्यार्थ्यांशी त्यांची व्यवस्थित ओळख व्हावी आणि त्यातून त्यांच्याशी योग्य समन्वय निर्माण व्हावा या उद्देशाने स्वागताचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो, असे मत मानव विज्ञान विद्या शाखा अधिष्ठाता तथा इतिहास विभाग प्रमुख डॉ. शामराव कोरेटी यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करताना व्यक्त केले. विभागाचे नाव हे विद्यार्थ्यांच्या यशावर अवलंबून असते म्हणून कर्तृत्ववान विद्यार्थी विभागाचे नाव मोठे करीत असतो. विभागातून शिकलेला विद्यार्थी यशाच्या उंच शिखरावर जाऊन विभागाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करीत असतो.
आजचा विद्यार्थी हा सर्व गुणांनी आणि कलांनी संपन्न आहे. त्यांच्या या कलागुणांना वाव देण्यासाठीच विभागात अशा प्रकारचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबविल्या जाते. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक योग्य मंच सुद्धा मिळतो. विद्यार्थ्यांच्या जीवनातील सांस्कृतिक कार्यक्रम हा महत्त्वाचा ठेवा आहे. विद्यार्थी तो आयुष्यभर जपतो, असे डॉ.कोरटी म्हणाले. प्रवेशित विद्यार्थ्यांनी विभागात नियमित यावे आणि वर्षभरात होणाऱ्या विविध कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. विभागातील डॉ. लक्ष्मण गोरे, डॉ. राकेश कोरेकर, डॉ. प्रदीप चौहान यांनीही विद्यार्थ्यांचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या. यानंतर सीनियर विद्यार्थ्यांनी प्रवेशित विद्यार्थ्यांकरिता मनोरंजनात्मक विविध स्पर्धांचे आयोजन केले. प्रवेशित विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांना योग्य प्रतिसाद दिला. नृत्य, गाणी सादर करून कार्यक्रमात एक वेगळी रंगत निर्माण केली. मनोरंजनात्मक खेळांच्या स्पर्धांमधून मिस्टर प्रेशर म्हणून एमए प्रथम वर्षाचा विद्यार्थी वेदांत चट्टे याची निवड करण्यात आली. मिस फ्रेशर म्हणून कु. दामिनी सहारकर हिची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक ठाकरे यांनी केले. संचालन यश बलवीर यांनी केले तर आभार अनुराग गायकवाड यांनी मानले.