– श्रीगणेश मुर्ती विसर्जनासाठी २ पर्यायी व्यवस्था
– मूर्तिकारांना विक्रीसाठी मिळणार पर्यायी जागा
– मनपात आढावा बैठक
चंद्रपूर :- आगामी गणेशोत्सव सोहळ्यादरम्यान विसर्जन व्यवस्था सुरळीत होण्याच्या दृष्टीने चंद्रपूर मनपातर्फे दोन पर्यायी व्यवस्था करण्यात आल्या असुन लहान श्रीगणेश मुर्ती ईरई नदी पात्रात तर मोठ्या श्रीगणेश मुर्तींचे विसर्जन ईरई नदी पात्रालगत तयार करण्यात आलेल्या मोठ्या विसर्जन कुंडात करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी मनपा सभागृहात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत दिली.
पीओपी मूर्ती निर्मिती,साठा व विक्री संबंधित उपाययोजनेबाबत मंगळवार ३० जुलै रोजी मनपा सभागृहात आयोजीत आढावा बैठकीत माहिती देतांना आयुक्तांनी सांगितले की, मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या या विसर्जन कुंडाची क्षमता अंदाजे ३० लाख लिटर पाण्याची असुन ८१३७ स्केयर फुट क्षेत्रफळ आहे. १० फुट पर्यंत उंची असलेल्या मूर्तींचे यात विसर्जन करता येणे शक्य आहे.त्यापेक्षा मोठी मूर्ती असल्यास विसर्जनास अडथळा निर्माण होऊ शकतो. एकावेळेस २ मोठी वाहने उभी राहण्यास २ वेगवेगळे प्लॅटफॉर्म बनविण्यात आले असुन क्रेनच्या साहाय्याने मोठ्या मूर्तींचे विसर्जन करता येणे शक्य होणार आहे. पुढील वर्षी भरणद्वारे (WBM) कच्चा रोडसुद्धा विसर्जन स्थळी बनविण्यात येणार आहे.
मूर्तिकारांना मिळणार पर्यायी जागा –
मुर्तीकार सध्या ज्या जागांवर मुर्तींची विक्री करतात त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहतुकीची समस्या निर्माण होते. ज्याप्रमाणे फटाके विक्री करणारे विक्रेते एकाच जागी म्हणजे कोनेरी तलाव येथे विक्री करतात त्याच धर्तीवर मूर्तिकारांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व मूर्तिकार गटांची लवकरच बैठक घेण्यात येणार आहे.
पीओपी मूर्तींवर असणार वॉच –
चंद्रपूर शहरात नागरिकांच्या सहकार्याने पीओपी मूर्तीं बनविणे, त्यांचा वापर व विक्री पूर्णतः बंद आहे व १०० टक्के पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा केला जातो. यावर्षीसुद्धा झोननिहाय पथकांद्वारे प्रत्यक्ष आणि गुप्त पद्धतीने मूर्तींची तपासणी केली जाणार आहे. मूर्तिकार व मातीच्या मूर्ती विक्री करणारे मूर्तिविक्रेते दोघांनाही मनपाकडे नोंदणी बंधनकारक आहे,नोंदणी न करता मूर्ती विक्री करणाऱ्यावर तसेच मनपाने निश्चित करून दिलेल्या जागेशिवाय इतरत्र मूर्ती विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
एकल खिडकी सुविधा –
गणेश मंडळांना महापालिका व इतर विभागाकडून रीतसर परवानग्या घ्याव्या लागतात. पोलीस स्टेशन, ट्राफिक पोलीस स्टेशन,सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन, महावितरण केंद्र, महानगरपालिका इत्यादी विभागाच्या परवानगी या एकच ठिकाणाहुन घेता याव्या यासाठी दरवर्षीप्रमाणे एक खिडकी प्रणाली सुद्धा मनपातर्फे सुरु करण्यात येणार आहे.
आढावा बैठकीस उपायुक्त मंगेश खवले,शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, दुर्गापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लता वाढीवे, रामनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत कदम,शहर अभियंता विजय बोरीकर,अमोल शेळके,जिल्हा शांतता समितीचे सदस्य सय्यद रमजान अली, सदानंद खत्री, इको प्रो संस्थेचे बंडु धोत्रे, गणेश मंडळ व मुर्तीकार प्रतिनिधी उपस्थीत होते.