नागपूर :- साहित्यभूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मंगळवारी १ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे अभिवादन करण्यात आले. दीक्षाभूमी जवळील साहित्यभूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक स्थळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून वंदन केले.
याप्रसंगी ऑटोरिक्षा आघाडी चे अध्यक्ष जीवन तायवाडे, भटक्या विमुक्त मोर्चा अध्यक्ष किशोर सायगण, अशोक मरस्कोल्हे, अमित नायडू, गुड्डू बिसेन, वसीम काझी, तुषार खोडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. अण्णाभाऊ साठे यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या शाहीरीने तळागाळातील कष्टकरी, मजूर वर्गाच्या प्रश्नांना वाचा फोडली. अण्णाभाऊ साठे यांचे राज्यासह देशावर अनेक उपकार असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.