मुंबई :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या त्रेसष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी सोमवारी (दि. १) छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वज फडकावला व जनतेला संबोधित केले.
यावेळी राज्यपालांनी संचलनाचे निरीक्षण केले तसेच समारंभीय संचालनाकडून मानवंदना स्वीकारली. राज्यपालांच्या भाषणाच्या मराठी, इंग्रजी व हिंदी प्रती जोडल्या आहेत.
मुख्य शासकीय सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इकबाल सिंह चहल, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, मानद वाणिज्यदूत, सशस्त्र सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी तसेच प्रशासन व पोलीस दलातील ज्येष्ठ अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
यावेळी राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस दल, बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई महिला सशस्त्र पोलीस दल; मुंबई लोहमार्ग पोलीस डाळ, महाराष्ट्र पोलीस ध्वज, बृहन्मुंबई पोलीस ध्वज, राज्य राखीव पोलीस बल ध्वज व मुंबई अग्निशमन सेवा संचालनालय ध्वज यांच्या निशाण टोळ्या, बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगर पालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा तसेच ब्रास बँड व पाईप बँड वाद्यवृंद पथकाने दिमाखदार संचलन केले.
संचलनात बृहन्मुंबई पोलीस विभागाची ४ महिला निर्भया पथके व मुंबई अग्निशमन दलाची अत्याधुनिक वाहने देखील सहभागी झाली होती.
राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या हस्ते नियुक्ती आदेश वाटप
यंदाच्या कार्यक्रमात प्रथमच, राज्य शासनाच्या अंतर्गत विविध विभागांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांपैकी प्रातिनिधिक स्वरुपात १० उमेदवारांना राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश व शिफारस पत्रे देण्यात आली. भूमी अभिलेख, राज्य उत्पादन शुल्क परिवहन विभाग आदी विभागांमध्ये त्यांची निवड झाली आहे.
मान्यवरांच्या भेटी व शुभेच्छा
कार्यक्रमानंतर राज्यपालांनी उपस्थित सैन्य दल, पोलीस दल, अग्निशमन दल, विविध देशांचे मुंबईतील प्रतिनिधी तसेच इतर वरिष्ठ अधिकारी व सेवानिवृत्त अधिकाऱ्यांजवळ जाऊन त्यांना राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
महानगर पालिकेतर्फे राज्य स्थापना दिन साजरा
मुख्य शासकीय सोहळ्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे क्रीडाभवन येथे आयोजित महाराष्ट्र दिन कार्यक्रमाला उपस्थित राहून देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम ऐकला. यावेळी महाराष्ट्र गीतांचे उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल राज्यपालांनी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या संगीत कला अकादमीला पंचेवीस हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी राज्यपालांचे स्वागत केले.
मा. राज्यपालांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे. यानिमित्ताने येत्या 2 ते 9 जून 2023 या कालावधीमध्ये शिवराज्याभिषेक महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरीवर महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित संग्रहालय उभारण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा 28 मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत “स्वातंत्र्यवीर गौरव दिन” म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत उपचारांची मर्यादा वार्षिक 1.50 लाख रुपयांवरुन 5 लाख रुपये करण्यात आली आहे. याशिवाय यामध्ये नवीन 200 रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्यात येत आहे.
राज्यात 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे प्राधान्याने करण्यात येणार आहेत. मुंबईतील जी.टी. रुग्णालयात तृतीयपंथासाठी विशेष कक्ष सुरु करण्यात आला आहे.
प्रत्येक जिल्हयातील किमान 500 युवकांना जलपर्यटन, कृषीपर्यटन, कॅराव्हॅन पर्यटन, साहसी पर्यटन तसेच शाश्वत पर्यटन तसेच आदरतिथ्य क्षेत्रात प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करण्यात येईल.
बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” आणली आहे. यामध्ये केंद्र शासनामार्फत प्रतिवर्षी प्रतिशेतकरी 6 हजार रुपये देत असून आता राज्य शासनही प्रति शेतकरी 6 हजार रुपये देणार असल्याने राज्यातील शेतकऱ्यांना 12 हजार रुपये दरवर्षी मिळणार आहेत.
शासनामार्फत प्रकल्पबाधित मच्छिमारांना नुकसानभरपाई देण्यासाठी सर्वसमावेशक धोरण करण्यात आले आहे. या वर्षापासून पारंपारिक मासेमारी करणाऱ्या मच्छिमार बांधवांसाठी 5 लाख रुपयांची विमा छत्राची योजना राबविण्यात येणार आहे.
माझ्या शासनाने मुलींच्या सक्षमीकरणासाठी “लेक लाडकी” ही नवीन योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर ती 18 वर्षांची झाल्यानंतर रोख 75 हजार रुपये देण्याची योजना आहे. याशिवाय महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासात तिकीट दरात सरसकट 50 टक्के सवलत लागू करण्यात आली आहे.
महिलांना घर खरेदीमध्ये मुद्रांक शुल्कात 1 टक्का सवलत देण्यात आली आहे. 75 वर्षांवरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या एसटी बसेसमधून मोफत प्रवास तसेच 65 ते 75 वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधील प्रवासी भाडयात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यासह अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर देण्यात यावा याकरिता शासन केंद्राकडे पाठपुरावा करीत आहे. येत्या काळात अमरावती येथील रिध्दपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे.
माझ्या शासनाने वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास आर्थिक सहाय्याच्या रकमेतही 15 लाख रुपयांवरून 20 लाख रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे.