– युवकांसाठी रील मेकिंग स्पर्धा
नागपूर :- विधानसभा निवडणुकीमध्ये नागपूर शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे याकरिता जनजागृतीसाठी नागपूर महानगरपालिका द्वारे विविध अभियान राबविण्यात येत आहेत. नागपूर शहरात मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता भारत निवडणूक आयोगाचे ‘मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग’ अर्थात स्वीप कार्यक्रम अंतर्गत शहरात येत्या शनिवार 9 नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता, धंतोली स्थित यशवंत स्टेडियम येथे “व्होटेथॉन” मतदार जनजागृती दौडचे आयोजन करण्यात येत आहे. या “व्होटेथॉन” स्पर्धेच्या टी-शर्टचे अनावरण नागपूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी व मनपाचे अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप चे नोडल अधिकारी अजय चारठाणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
गुरुवारी (ता:7) सिव्हिल लाईन्स स्थित जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित छोटेखानी समारंभात जिल्हा परिषदेचे डॉ. कुणाल बोडके, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, यांच्या सह अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी प्रशासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या रिल मेकिंग स्पर्धा, टॉगलाईन/स्लोगन स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, लघूपट अर्थात शॉर्ट फिल्म स्पर्धेच्या पोस्टर्सचे अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमापूर्वी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी व मनपाचे अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप चे नोडल अधिकारी अजय चारठाणकर यांनी युवा पिढीला भुरळ घालणाऱ्या इन्स्टाग्राम, रिल्स, फेसबुक पेज, रेडिओ जॉकी, असे सोशल मीडियावर प्रभुत्व असलेल्या इन्फ्लुएंसर यांची बैठक घेतली.
आजची युवा पिढी ही रिल्स व इतर सोशल मीडियावरील संदेशांना तात्काळ प्रतिसाद देते. यातील सामाजिक आशय आणि संदेशाचा भाग लक्षात घेतला तर एका अर्थाने इन्फ्लुएंसर हे मतदानासाठी नागरिकांच्या मनात मतदानाची भावना निर्माण करण्यास मदत करतील अशी अपेक्षा आहेत. आपल्या देशाच्या लोकशाहीला सक्षम करणाऱ्या मतदान जनजागृती मोहिमेत आपले उत्तरदायीत्व लक्षात घेवून सोशल मीडिया इन्फ्लुएंसर यांनी पुढे आले पाहिजे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. तसेच आपल्या माध्यमातून येत्या 20 नोव्हेंबर रोजी अधिकाधिक नागरिकांनी घराबाहेर पडत मतदान करावे असे आवाहन करण्यात यावे असे त्यांनी सांगितले.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार “स्वीप” अंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारा मतदार जनजागृती करिता शनिवार, 9 नोव्हेंबर 2024 सकाळी ६ वाजता, धंतोली स्थित यशवंत स्टेडियम येथे “व्होटेथॉन” मतदार जनजागृती दौडचे आयोजन करण्यात येत आहे. याठिकाणी झुम्बा, डान्स, रनींग, फन वॉक, फॅन्सी ड्रेस आदी विविध माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.
“व्होटेथॉन” मध्ये भाग घेण्यासाठी सर्वप्रथम https://khelpe.in/nmc_votethon या लिंक वर किंवा दिलेल्या QR कोडवर जाऊन नोंदणी करायची आहे. विशेष म्हणजे, व्होटेथॉन साठी नोंदणी करणाऱ्या प्रथम 5000 नागरिकांना टी-शर्ट मोफत दिली जाणार आहे. आजवर स्पर्धेसाठी 2900 स्पर्धेकांची नोंदणी झाली असून, अधिकाधिक संख्येत स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.