मुंबई (Mumbai) : देशातील पायाभूत सोयी-सुविधांच्या कामांसाठी मी अर्थसंकल्पावर अवलंबून राहत नाही. भांडवली बाजारातून यासाठी निधी उपलब्ध करतो. यासाठी आज अनेक विदेशी संस्था रांगा लावून उभ्या आहेत; परंतु यापुढे देशाच्या पायाभूत सुविधा गरीब माणसाच्या पैशांतून उभ्या करणार, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कल्याण येथे केले.
कल्याण जनता सहकारी बँकेच्या सुवर्णमहोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. गडकरी म्हणाले की, आपल्याला दरवर्षी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी तीन लाख कोटींची गरज भासते. विदेशातून यासाठी अनेक संस्था अर्थसाहाय्य करण्यासाठी इच्छुक आहेत; परंतु यापुढे त्यांच्याकडून हा पैसा न घेता देशातील निवृत्त व्यक्ती, सफाई कामगार, शिपाई, कॉन्स्टेबल, पत्रकार आदी नोकरदार वर्गाकडून पैसे उभे करण्याची आपली इच्छा आहे. या नोकरदार मंडळींना आठ टक्के रिटर्न देऊन त्यांच्या पैशातून देशामध्ये महामार्ग उभारणार, असे गडकरी म्हणाले.
बॅंकांनीही यात गुंतवणूक करण्यास हरकत नाही, असा सल्लाही त्यांनी या वेळी उपस्थित बँक कर्मचाऱ्यांना दिला. जागतिक अर्थव्यवस्थेतील राष्ट्रे भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत असून त्यांना भारतासोबत व्यवहार करायचा आहे. यासाठी परिपूर्णता देखील महत्त्वाची असून ती अनुभव आणि सरावातून निर्माण होणे गरजेचे असल्याचे गडकरींनी यावेळी सांगितले.
एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा इतर कामासाठी कर्ज घेण्यासाठी बॅंकांकडून विविध कागदपत्रे सादर करण्याचा तगादा लावण्यात येतो. जो माणूस प्रामाणिक आहे, पाच वर्षांचा त्याचा रेकॉर्ड चांगला आहे, त्याला चोवीस तासांत योग्य रेटिंग दिले गेले पाहिजे. कागदपत्रांचा तगादा थांबवा. वेळेत निधी उपलब्ध झाला नाही, तर व्यावसायिकांची खूप मोठी अडचण होत असल्याचे गडकरी यांनी सांगितले.