महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. राज्यातील 288 मतदारसंघांसाठी जवळपास 7 हजारपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात उतरले आहेत. विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. सध्या सर्वत्र प्रचाराचा धुराळा उडताना दिसत आहे. त्यातच आता महायुतीकडून प्रचाराचे जोरदार नियोजन करण्यात आले आहे.
भाजपने आखला मेगाप्लॅन
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपने मेगा प्लान आखला आहे. महाराष्ट्रात भाजपकडून 100 हून अधिक सभांचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, योगी आदित्यनाथ यांसारखे अनेक मोठे चेहरे जाहीर सभा घेणार आहेत. महाराष्ट्रात नरेंद्र मोदींच्या १० सभा होणार आहेत. तर अमित शहा यांच्या २०, योगीआदित्यनाथ यांच्या २२ सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा 8 नोव्हेंबर रोजी धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी असणार आहे.
नरेंद्र मोदींच्या कुठे किती सभा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 15 ते 20 उमेदवारांसाठी संयुक्त सभा घेणार आहेत. यातील पहिली सभा ८ तारखेला होणार आहे. तर दुसरी सभा ९ नोव्हेंबरला अकोला आणि नांदेड या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ १२ तारखेला पंतप्रधान मोदी चिमूर, सोलापूर आणि पुणे या ठिकाणी सभा घेणार आहेत. तर १४ नोव्हेंबरला संभाजीनगर, नवी मुंबई आणि मुंबई या ठिकाण मोदींची सभा होणार आहे.
राज्यातील विविध भागात पंतप्रधान मोदींच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे. या सभेवेळी केंद्र सरकारच्या योजना आणि डबल इंजिन सरकार महाराष्ट्राचा कसा विकास करु शकते, या मुद्द्यांवर भर दिला जाणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, ४४ लाख शेतकऱ्यांचं वीज बिल माफी अशा सरकारच्या ५८ विविध योजनांबद्दल जाहीरात केली जाईल. त्यानंतर लोकं मतदान करतील, असा अंदाज भाजपने लावला आहे.
शिंदे, फडणवीस, अजित दादाही महाराष्ट्रभर फिरणार?
महायुतीच्या सर्व उमेदवारांसाठी पंतप्रधान मोदी यांच्या सभा होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्रात २० सभा घेणार आहेत. तर योगी आदित्यनाथ यांच्या २२ सभा आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ५० सभा होणार आहेत. त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांच्या ५५ सभा होणार आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघीही संपूर्ण महाराष्ट्रभर सभा करताना दिसणार आहेत.