संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे आयोजन
अमरावती :- स्टार्टअप यात्रेच्या माध्यमातून नवउद्योजकांनी देशाच्या प्रगतीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले. राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी व उद्योजकता आणि नाविन्यपूर्ण परिसीमा बळकट करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात ‘महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा’ चे नुकतेच आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे, उपायुक्त सुनिल काळबांडे, तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक व्ही. आर. मानकर, उद्योजक सहसंचालक घुले, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाच्या संचालक डॉ. स्वाती शेरेकर व स्टार्टअपचेे प्रतिनिधी सुमित संघई आदी उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन करुन नवउद्योजकांसाठी असणाया शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. स्टार्टअप यात्रेच्या माध्यमातून नवउद्योजकांनी देशाच्या प्रगतीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. कार्यशाळेत उद्योजक सुमित संघई व संकेत गुल्हाने यांनी आपल्या अनुभव कथनातून नवउद्योजकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये कृषी, शिक्षण, आरोग्य, सस्टेनेबिलिटी, ई प्रशासन, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता या सहा विभागांमध्ये नवउद्योजकांनी आपल्या विविध कल्पना सादर केल्यात. यामध्ये जिल्हास्तरीय विजेत्यांची निवड कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीद्वारे करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्कील डेव्हलपमेंट ऑफिसर वैशाली पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता देठे, शैलजा, राठोड, निळे, रौदाळे तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातील कर्मचारी, विद्यापीठातील विविध विभागातील शिक्षक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.