नागपूर – जिल्हा प्रमुखांच्या गावात शिवसेना बाराच्या भावात अशी अवस्था कुहीमध्ये झाली आहे. येथील नगर पंचायत निवडणुकीत एकही शिवसैनिक निवडून आला नाही. यापेक्षा दुदैवाची बाब म्हणजे या निवडणुकीत उभे करायला १७ शिवसैनिकसुद्धा राज्यातील मुख्यमंत्र्याच्या पक्षाला सापडले नाही.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी कार्यकर्त्यांना संधी मिळावी याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वच पक्ष स्वबळावर लढले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या संधीचा पुरेपूर वापर केला. आपल्या समर्थकांना मोठ्या प्रमाणात निवडून आणले. शिवसेनेलासुद्धा आपली ताकद दाखवण्याची आणि संख्याबळ वाढवण्याची संधी नगर पंचायत निवडणुकीने दिली होती. मात्र निष्क्रिय पदाधिकाऱ्यांमुळे शिवसैनिकांच्या पदरी निराशा आली.
कुही येथील संदीप इटकेलवार सेनेचे अनेक वर्षांपासून जिल्हा प्रमुख आहेत. आघाडी सरकारने नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. शिवसैनिकांना बळ देण्याची सोय पक्षाने त्यांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे जिल्हा सोडा किमान आपल्या गावात तरी भगवा झेंडा उंच करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. निवडणूक जाहीर झाल्यावरही त्यांनी कधी याबाबत शिवसैनिकांची चर्चा केली नाही. निवडणूक लढायची आहे की नाही याची विचारणासुद्धा केली नाही? जिल्हा प्रमुखांच्या गावात १७ उमेदवार शोधणे फारसे कठीण नाही. अनेकजण इच्छुकसुद्धा होते. मात्र प्रमुखच पुढाकार घेतील नसल्याने स्वतः कोण लढणार असा प्रश्न निर्माण झाला होता. शेवटी पक्षाविषयी तळमळ असलेल्या तीन शिवसैनिकांनी हिंमत बांधली. उमेदवारी दाखल केली. त्यांनाही कोणी रसद पोचवली नाही किंवा पाठबळ दिले नाही. नागपूर जिल्ह्यात शिवसेनेचा खासदार आणि एक आमदार आहेत. शेकडो पदाधिकारी आहेत. मात्र प्रचारासाठी कोणी फिरकले नाहीत. शिवसेना लढत आहे असा संदेशही मतदारांपर्यंत पोचवला नाही? त्यामुळे तीन उमेदवारांचे जे व्हायचे तेच झाले. काँग्रेस ८, राष्ट्रवादी ४ आणि भाजपने ४ जागा जिंकल्या. यात एक अपक्ष उमेदवार निवडून आला मात्र शिवसेनेच्या हाती भोपळा आला.
सुधार प्रन्यासचे विश्वस्त म्हणून मिरवण्यापेक्षा जिल्हा प्रमुखांनी किमान स्वतःच्या गावात जरी हिंमत दाखवली असती तर दोनचार उमेदवार सहज निवडून आले असते. अनेक महिन्यांपासून कुहीसह शेजारच्या तालुक्यांमध्ये तालुका प्रमुखांची नियुक्तीसुद्धा करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांना शिवसेना वाढवायची आहे की संपवायची आहे असा संतप्त सवाल कुही तालुक्यातील शिवसैनिकांचा आहे.