नागपूर :- नागपूर शहरामध्ये महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार मराठा समाजाच्या व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाच्या कार्याला सुरूवात होत असून नागरिकांनी या सर्वेक्षणात नियुक्त कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाच्या अनुषंगाने रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित कर्मचा-यांच्या दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये बुधवारी (ता.२४) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपायुक्त निर्भय जैन, सहायक आयुक्त महेश धामेचा आदी उपस्थित होते. बुधवार (ता.२४) आणि गुरूवारी (ता.२५) दोन दिवस ६५०० कर्मचा-यांना सकाळ व दुपारच्या सत्रात प्रशिक्षण दिले जाणार आहे.
यावेळी मनपा आयुक्तांनी कर्मचा-यांना सर्वेक्षणाबाबत माहिती दिली. मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी नागपूर शहरात २१३५ बुथ असून या बुथस्तरावर यादी तयार करण्यात आलेली आहे. प्रत्येक यादीसाठी बुथ स्तरीय अधिकारी, सेवा अधिग्रहीत केलेले कर्मचारी आणि शिक्षक सवैक्षण करतील यांना नागपूर शहरातील प्रत्येक घरी जाउन माहिती संकलीत करणे अनिवार्य आहे. सर्वेक्षणासाठी शासनाकडून प्रश्नावली तयार करण्यात आलेली आहे. या प्रश्नावलीमध्ये नमूद सर्व प्रश्न प्रगणकांनी प्रत्येक घरी विचारणे आवश्यक असून नागरिकांनी देखील या प्रश्नांची इत्यंभूत योग्य व अचूक माहिती प्रगणकांना द्यावी, असेही आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.
विहीत कालावधीमध्ये योग्य आणि अचूक सर्वेक्षण पूर्ण करणे आवश्यक असून प्रगणकांनी प्रशिक्षणानंतर त्वरीत तांत्रिक बाबी समजून घ्याव्यात. प्रत्येक चमूंमागे पर्यवेक्षकांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यामध्ये बुथ स्तरीय अधिका-यांची भूमिका महत्वाची आहे. यापूर्वी देखील त्यांनी संबंधित भागात काम केले असल्यामुळे त्यांनी नेतृत्व करीत वेळेत काम करण्यासाठी पुढाकार घेण्याचे देखील आवाहन आयुक्तांनी कले आहे.
कार्यालय प्रमुखांनी कर्मचारी त्वरीत उपलब्ध करून द्यावे
मराठा समाजाच्या व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षण कार्यासाठी विविध विभागाच्या कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विहित कालावधीमध्ये सर्वेक्षण कार्य पूर्ण व्हावे यासाठी संबंधित विभागाच्या कार्यालय प्रमुखांनी सर्वेक्षण कार्यासाठी अधिग्रहीत कर्मचा-यांना तातडीने सर्वेक्षण कार्यासाठी उपलब्ध करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.