मुंबई :- पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत गावात पाणी पुरवठ्यासाठी प्रादेशिक योजना सुरु केल्या जातात. योजनांचे काम पूर्ण झाल्यावर त्या संबंधित जिल्हा परिषद किंवा ग्राम पंचायतीकडे वर्ग होतात मात्र सदर पाणीपुरवठ्याचे विद्युत देयक अनेक ग्रामपंचायती भरत नसल्याने वीज खंडित केली जाते. येणाऱ्या काळात वीज बिल भरण्यासाठी ठराविक टप्पे देण्याबाबत विचार करण्यात येईल असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
सदस्य समाधान आवताडे यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. याला पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले.
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, मंगळवेढा तालुक्यातील भोसे आणि 39 गावातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत 11 जुलै 2014 रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. ही योजना जून 2017 मध्ये पूर्ण करण्यात येऊन जून 2017 ते फेब्रुवारी 2020 या काळात सर्व गावांना सुरळीत पाणी पुरवठा करीत होती. नंतरच्या काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ही योजना जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली. ही योजना सुरळीत सुरु होती, मात्र विद्युत देयके अदा न केल्याने ही योजना बंद पडली. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी विद्युत देयक भरल्यास योजना सुरु करण्यात येणार आहे.