वारकरी संप्रदायाकडून समाज घडविण्याचे कार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

– ह.भ.प मारुती महाराज कुरेकर यांचा 93 वा आणि ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांचा 70 वा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

पुणे :- वारकरी संप्रदाय हा वारकरी पंथाला आपले संपूर्ण जीवन अर्पण करणारा; राज्याला, देशाला समाज प्रबोधनाची दिशा देणारा, चुकले माकल्यांना सन्मार्गाची दिशा देणारा असून समाज घडविण्याचे काम वारकरी संप्रदाय करतो, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आळंदी येथे फ्रुट वाले धर्मशाळा येथे झालेल्या अभिष्टचिंतन, पुरस्कार प्रदान आणि वारकरी संतपूजन समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ह.भ.प मारुती महाराज कुरेकर यांना 93 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त शांतीब्रह्म पुरस्कार आणि ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांना 70 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त तुलसीदास पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, खासदार श्रीरंग बारणे, म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह. भ. प. संदीपान महाराज शिंदे (हासेगावकर), ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्राप्त ह. भ. प. संजय महाराज पाचपोर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र ही संतांची भूमी असून मोठी संत परंपरा आपल्याला लाभल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, संत परंपरा, वारकरी पंथ हे महाराष्ट्राचे वैभव आहे. राजकीय अधिष्ठानापेक्षा वारकरी पंथाचे अध्यात्मिक आणि धार्मिक अधिष्ठान मोठे आहे. कारण धकाधकीच्या आयुष्यात पांडुरंगाचे नामस्मरण करताना चांगले विचार, चांगले कार्य करण्याचे विचार मनात येतात, दुष्ट विचार दूर जातात. मला काय मिळाले यापेक्षा दुसऱ्याला काय देणार हे महत्त्वाचे आहे. स्वत:साठी जगत असताना दुसऱ्याचे दु:ख वाटून घेण्याचे काम करणाऱ्यांपैकी वारकरी संप्रदाय आहे, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आजचा कार्यक्रम आपल्या आयुष्यातला आगळा वेगळा कार्यक्रम आहे. संतांचे पूजन करणे यापेक्षा वेगळे भाग्य नाही. ह.भ.प. मारोती महाराज कुरेकर, ह.भ.प. रामराव महाराज ढोक आणि वारकरी संस्थेचे योगदान मोठे आहे. शिकवणाऱ्याला मानधन नाही आणि शिकणाऱ्यालाही शुल्क नाही अशी जगात नसेल अशी ही संस्था आहे. 107 वर्षे झालेली ही संस्था आपले नाव जपण्याचे काम करत आहे. एक पिढी घडविण्याचे काम ही संस्था करत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी संस्थेचा आणि ह.भ.प कुरेकर महाराज आणि ह.भ.प. ढोक महाराज यांचा सन्मान केला. वारकरी मंडळ, वसतीगृह यातील तांत्रिक अडचणी लवकरच दूर करण्यात येईल, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

गेल्या 2 वर्षात शासनाने 600 च्यावर निर्णय घेतले, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आम्ही नियोजन करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. आपणदेखील सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. आपल्यालाही गरिबी माहिती आहे. सर्वात जास्त अर्थव्यवस्था चोख बजावणारी लाडकी बहीण सगळ्यात हुशार असते. म्हणून ही योजना सुरू केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी वर्षभराची तरतूद केली असून दरमहा निश्चित रक्कम मिळणार आहे. या योजनेबरोबरच लेक लाडकी लखपती योजना, मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय, एस. टी. प्रवासात महिलांना 50 टक्के सवलत, ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना आदी योजना राबवित आहे. त्यांनी पुढे सांगितले, शासनाने शेतकऱ्यांना अतिवृष्टी, गारपीठ, दुष्काळ आदीसाठी आतापर्यंत 16 हजार कोटी रुपये नुकसान भरपाई दिली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीला राज्याच्या नमो महासन्मान योजनेची 6 हजार रुपयांची जोड देऊन वर्षाला एकूण 12 हजार रुपये देण्यात येत आहेत. 1 रुपयात पीक विमा देणारे हे देशातील पहिले सरकार असून 7.5 एच. पी. पर्यंतच्या शेतीपंपाचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाने एकीकडे बंद पडलेले प्रकल्प सुरू केले. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंक, अटल सेतू असे विकासाचे प्रकल्प राबवित असून हाताला रोजगार मिळण्याच्या दृष्टीने नवीन उद्योग आणण्याचे काम केले जात आहे. महाराष्ट्र उद्योग, परदेशी गुंतवणूक मध्ये आघाडीचे राज्य असून देशातील एकूणपैकी 52 टक्के परदेशी गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबरोबर लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यक्रम सुरू केला आहे. त्यांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण तसेच विद्यावेतनही मिळणार आहे. यात आतापर्यंत 1 लाख 50 हजार उमेदवारांनी अर्ज भरले असून त्यांना नियुक्ती पत्रे दिली आहेत. त्यामुळे एकीकडे विकास कार्य आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना अशी सांगड घालण्याचे काम सरकार करत आहे.

सरकार राज्यातील सर्वसामान्यांना सुविधा देण्याचे काम आहे. गड किल्ल्यांच्या विकास, तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याचे धोरण हाती घेतले आहे. चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी या नद्यांच्या प्रदूषण मुक्तीचे आराखडे करत आहोत. महाराष्ट्राला शेती, सिंचन, शिक्षण, उद्योग, आरोग्य, पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान आदींमध्ये आधुनिक बनविण्याचा प्रयत्न करत आहोत.

मंत्री भुसे म्हणाले, राज्यात वारकरी महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. प्रत्येक दिंडीला अनुदान, वारकरी बांधवांसाठी साहित्य याशिवाय येणाऱ्या काळात किर्तनकारांना सन्मान निवृत्तीवेतन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून पुढील काम सुरू आहे, असेही ते म्हणाले.

ह.भ.प. मारोती महाराज कुरेकर म्हणाले, संतांच्या शिकवणीचा, वाङमयाचा विसर पडू नये यासाठी काम करणारी ही वारकरी शिक्षण संस्था आहे. वारकऱ्यांना अध्यात्मिक समाधान मिळवून देण्यासाठी संस्था कार्य करत आहे. संस्थेच्या गरजा शासनामार्फत पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ह.भ.प. रामराव महाराज ढोक म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांच्या सन्मान केला. हजारो कीर्तनकार निर्माण करण्याचे काम शंतीब्रह्म ह.भ.प. मारोती महाराज कुरेकर यांनी केले. या संस्थेला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. शासन रस्ता तयार करते, त्यावर कसे चालावे हे वारकरी संप्रदाय शिकवतो, असेही ते म्हणाले.

इतर कार्यक्रमात आयोजकांच्यावतीने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत होते. मात्र या कार्यक्रमात ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान सोहळा होत आहे अशा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच ह.भ.प मारुती महाराज कुरेकर, ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्यासह वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले, हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.

ह. भ. प. बाळकृष्ण महाराज शिंदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नतूसिंग राजपूत यांनी लिहिलेल्या वारकरी शिक्षण संस्थेच्यावतीने प्रकाशित सार्थ गाथेच्या तृतीय आवृत्तीचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला वारकरी संप्रदायातील मान्यवर, वारकरी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन

Mon Sep 9 , 2024
पुणे :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी संस्थान समितीच्यावतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची प्रतिमा देऊन मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, खासदार श्रीरंग बारणे, म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com