– हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासन सज्ज
नागपूर :- नागपुरात येत्या ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मनपाच्या अख्यत्यारीत असलेल्या विविध कार्याचा नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवार (ता.३०) रोजी आढावा घेतला.
नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभा कक्षात घेण्यात आलेल्या बैठकीत मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी सदाशिव शेळके, उपायुक्त सुरेश बगळे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, महेश धामेचा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, लीना उपाध्ये, अग्निशमन अधिकारी बी. पी. चंदनखेडे, कार्यकारी अभियंता रवींद्र बुंदाडे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, वाईकर यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी बैठकीत सर्वप्रथम हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य रस्त्यांची डागडुजी, फुटपाथची डागडुजी, रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी, विद्युत खांबांवरील दिव्यांची सद्यस्थिती, वाहतूक पथदर्शक दिवे, रस्त्यांची साफसफाई, अग्निशमन व्यवस्था आदींबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. तसेच रस्त्यांच्या डागडुजी ला प्राधान्य देऊन पुर्ण करण्याचे निर्देश दिले. शहर सौंदर्यीकरणासोबतच स्वच्छतेवर विशेष भर द्यावा असे निर्देश देत सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असेही सांगितले.
याशिवाय आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी ज्या रस्त्यांचे काम सुरू आहे, त्याला सुरक्षित स्तरावर आणून वाहतुकीस योग्य ठेवण्याचे आदेश दिले. रस्त्यावर असलेल्या बांधकाम/पाडकाम मलबा (सी & डी वेस्ट) उचलून रस्ता मोकळा करावा, स्वच्छतेवर विशेष भर द्यावा. अधिवेशना दरम्यानच्या विविध मोर्चा स्थानावर पाण्याची व्यवस्था करवी, नागरिकांच्या सोयीसाठी विशेष बसेसची तयार ठेवाव्यात, अधिवेशनापूर्वी सुरू असलेले सर्व काम पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले.