कोयना (शिव सागर) येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

– महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार

मुंबई :-  सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथे शिव सागर जलाशयामध्ये जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित करण्यासाठी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करार झाला.

विधानभवन येथे झालेल्या सामंजस्य करारावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी -शर्मा, जलसंपदा विभागाचे उपसचिव अतुल कपोले, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सल्लागार सारंग कुलकर्णी उपस्थित होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ५ हजारपेक्षा अधिक स्थानिक नागरिकांना रोजगार मिळेल आणि पर्यटनातून १०० कोटीपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल होईल. अशी माहिती यावेळी देण्यात आली.

नैसर्गिक वरदान लाभलेला परिसर

शिवसागर जलाशयात जल पर्यटन विकसित करण्यासाठी मोठी संधी आहे. कोयना (शिव सागर), ता. जावळी हा परिसर येथील सह्याद्री डोंगराच्या रांगा, गर्द झाडी, निळेशार पाणी, समृध्द जैवविविधतेचे आगार असलेला, नैसर्गिक वरदान लाभलेला परिसर आहे. नव्याने होणाऱ्या जलपर्यटन केंद्राच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळावा, या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने हे जल पर्यटन केंद्र विकसित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी ४५ कोटी ३८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

महाराष्ट्राला मोहक ७२० किमीचा सागरी किनारा तसेच निसर्गसंपन्न छोटे – मोठे जलाशय, धरणे, प्रदूषण मुक्त नद्या यांचे वैभव लाभलेले आहे. या ठिकाणी जल पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्था वृद्धिंगत करण्यास आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास मोठा वाव आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्कूबा डायव्हिंग प्रकल्पामुळे सिंधुदुर्गात पर्यटक मोठ्या प्रमाणत आकर्षित झाले. नाशिक बोट क्लबचे प्रचलन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ करीत आहे. बोट क्लब पर्यटकांमध्ये लोकप्रिय झालेले आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे आणि गुजरातमधून नाशिकला येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढला. हा अनुभव बघता शासनाने महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण आणि जागतिक दर्जाचे जल पर्यटन प्रकल्प राबविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.

या प्रकल्पामुळे महाबळेश्वर, पाचगणी, वाईला येणारा पर्यटक कोयना जलाशयाच्या अवतीभोवती असलेल्या ग्रामीण भागात वळेल, तसेच पर्यटकांचा साताऱ्यात राहण्याचा काळ आणि खर्च करणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था वाढीस लागून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात शाश्वत रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होतील. अशी माहिती यावेळी देण्यात आली.

देशातील पहिले नाविन्यपूर्ण गोड्या पाण्यातील स्कूबा डायव्हिंग

या प्रकल्पामध्ये पर्यटकांच्या सोयीसाठी विविध पायाभूत सुविधा आणि जल पर्यटन प्रकार असतील. भव्य पॅव्हेलियन, कॉन्फरन्स हॉल, जलतरण तलाव, भारतातील पहिले नाविन्यपूर्ण गोड्या पाण्यातील स्कूबा डायव्हिंग, जल सफर मध्ये पर्यटन प्रकल्पात मोठी क्रुझ बोट ज्यामध्ये १०० च्या वर पर्यटक बसून, नाश्ता आणि जेवण याबरोबर कोयना जलाशयाच्या अवतीभोवतीच्या सह्याद्री पर्वत रांगा, हरित जंगले, वन्य जीव याचा आनंद घेऊ शकतात, भारतातील पहिली अत्याधुनिक आणि अलिशान हाउस बोट, सौर उर्जा/बॅटरीवर चालणारी बोट, अत्याधुनिक प्रवासी बोटी, हवेत उडणारी बोट, अत्यंत वेगवान जेट बोट, पॅरासेलिंग बोट, गोड्या पाण्यात पहिल्यांदा सेलिंग यॉट (शिडाची नौका) आणि त्याशिवाय आकर्षक वॉटर स्पोर्टस असतील. अशाप्रकारच्या जल पर्यटनाची आकर्षणे तसेच पायाभूत सुविधा असलेला हा भारतातील पहिला जल पर्यटन प्रकल्प असेल. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पुढील १० दिवसामध्ये प्राथमिक जल पर्यटन सुरु करण्यात येईल. दुसऱ्या टप्यात (८ महिन्यात) नवीन बोटी आणि इतर जल पर्यटन आकर्षणे यांचा अंतर्भाव करण्यात येईल. तिसरा आणि अंतिम टप्यात (२० महिन्यात) संपूर्ण नवीन भव्य वास्तू, क्रुझ बोट, हाउस बोट यांचा अंतर्भाव करून प्रकल्प पूर्ण केला जाईल.

प्रकल्पात पायाभूत सुविधा आणि विविध जल पर्यटन प्रकार

प्रकल्पातील पायाभूत सुविधांमध्ये नाविन्यपूर्ण जल पर्यटन केंद्र, पर्यटकांसाठी भव्य आसन व्यवस्था, विविध प्रकारच्या खाद्य प्रकारांचे उच्च दर्जाचे उपहारगृह, पर्यटकांसाठी विविध सुविधा व प्रशासकीय कार्यालय, जलतरण तलाव, स्कूबा प्रशिक्षण तलाव, कॉन्फरस हॉल, व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासाची सोय, बोटींसाठी आणि पर्यटकांसाठी उतरंडी, तरंगती जेट्टी (मरीना), वाहनतळ, आकर्षक बगीचा असतील.

यामध्ये विविध जल पर्यटन प्रकार जेट स्की, जेटो व्हेटर (पाण्यात उडणे), बम्पर राईड, कयाकिंग, बनाना राईड, सेलिंग, नाविन्यपूर्ण कृत्रिम तलावात गोड्या पाण्यातील स्कूबा डायव्हिंग, हवेत उडणारी बोट, फ्लाईंग फिश, अतिवेगवान जेट बोट राईड, सौर/विद्युत बोट, पर्यटकांसाठी आरामदायी प्रवाशी बोट, व्हर्ल पूल राईड, पॅरासेलिंग, अलिशान लेक क्रूझिंग प्रवासी बोट, अलिशान वेगवान बोट, मरीना, भारतातील पहिली अत्याधुनिक, अलिशान हाउस बोट असे विविध नाविन्यपूर्ण जल पर्यटन प्रकार असतील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बारीपाडा येथील कार्यकर्ते चैत्राम पवार यांना राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर

Tue Feb 27 , 2024
– आदिवासी क्षेत्रात चैत्राम पवार यांचे वनसंवर्धनासाठी मोलाचे काम – मंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई :- वन, वानिकी तसेच वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बारीपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथील कार्यकर्ते चैत्राम पवार यांना राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह, मानपत्र आणि वीस लाख रुपये असे आहे. महाराष्ट्र शासनाचा सर्वौच्च पुरस्कार असलेल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com