यवतमाळ :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी जी.यु.राजुरकर, कौशल्य विकासच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विनोद नागोरे, तज्ञ मार्गदर्शक डॉ.विवेक गंधेवार, डॉ.प्रशांत गावंडे तसेच सरफराज अहमद सौदागर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी मनोगत व्यक्त करतांना युवा वर्गासाठी शासनाच्या विविध उपक्रमांचा उल्लेख केला. युवावर्गाने करीअरची निवड करतांना दक्ष राहून निवड करावी, असे सांगितले.
महाराष्ट्र राज्य व जर्मनी यांच्यामधील 1 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याबाबतचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणामध्ये केला. जिल्ह्यातील युवकांना जर्मन भाषा शिकता यावी, याकरीता जिल्हा प्रशासकीय शिक्षण संस्थेमार्फत लॅग्वेज लॅब तयार करण्याचा उल्लेख त्यांनी केला.
या करीअर शिबिरामध्ये तीन मार्गदर्शन सत्र ठेवण्यात आलेले होते. या सत्रामध्ये डॉ.विवेक गंधेवार, डॉ.प्रशांत गावंडे तसेच सरफराज अहमद सौदागर या तज्ञ मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविकतेमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विनोद नागोरे यांनी आयटीआय मुलांचे जागतिक स्तरावर असलेले भविष्य व रोजगाराच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ अंतर्गत उपलब्ध शासकीय योजनांची माहिती सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी दिली. कार्यक्रमाचे आभार संस्थेचे प्रबंधक अनिल भूते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.