नागपूरच्या शेफ नीता अंजनकर यांचा 1000 किलो आंबील बनवण्याचा विक्रम

– शंखनाद न्यूज चॅनेलच्या वतीने विदर्भस्तरीय पाककला स्पर्धा

नागपूर :- प्रसिद्ध शेफ नीता अंजनकर यांनी अतुलनीय कामगिरी बजावत 1000 किलो आंबील बनवून एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. महाराष्ट्र टेलिकम्युनिकेशन नागपूर द्वारा संचालित शंखनाद न्यूज चॅनेलच्या वतीने विदर्भस्तरीय पाककला स्पर्धा घेण्यात आली. यात भरडधान्यापासून १००० किलो आंबील तयार करण्याचा हा विश्वविक्रम करण्यात आला. यावेळी एशिया बुक रेकॉर्डच्या ज्युरी मेंबर लता टाक आणि निखिलेश सावरकर यांनी विक्रम झाल्याची अधिकृत घोषणा करीत अवॉर्ड, प्रमाणपत्र आणि शिल्ड देऊन नीता अंजनकर यांना सन्मानित केले. हा उपक्रम रविवार, २८ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ८ ते ११ यावेळेत संचेती ज्युनिअर कॉलेज, साईबाबा मंदिरासमोरील भागात, वर्धा रोड, नागपूर येथे पार पडला.

यावेळी नागपूर येथील वेद संस्थेच्या अध्यक्षा रीना सिन्हा, सीआरपीएफचे डीआयजी प्रशांत जांभुळकर, शंखनाद न्यूज चॅनलच्या संचालिका राखी कुहीकर, संपादक सुनील कुहीकर मंचावर उपस्थित होते.

नागपुरातील कॅन्सर वॉरिअर, प्रसिद्ध शेफ नीता अंजनकर यांच्या नेतृत्वात 1 हजार किलो आंबील बनविण्याचा विश्वविक्रम कर्करोगाविरूद्ध लढा देणाऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांच्या साहसी कार्याचा सन्मान करण्यासाठी घेण्यात आला. यंदाचे वर्ष सुरक्षित, शाश्वत आणि निरोगी भविष्यासाठी भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यासंदर्भात जागृती करण्यासाठी आणि कर्करोगाशी लढा देण्याच्या दृढनिश्चयाने नीता अंजनकर यांनी एक हजार किलो आंबील बनवण्याचा संकल्प केला आणि रविवारी यशस्वीरित्या पूर्ण केला.यावेळी त्यांनी भरडधान्याचे महत्व आणि त्याचा वापर कसा करायचा याबाबतही जागरूकता निर्माण केली.

“पौष्टिक भरडधान्य आपण आपल्या नियमित आहारात समाविष्ट करायला हवे आणि ते कसे बनवायचे हे सगळ्यांना माहीत असावे,” असे त्या म्हणाल्या. “आंबील हे पौष्टिक आणि थंड पदार्थ आहे आणि उन्हाळ्यात ते खास उपयुक्त आहे. म्हणूनच मी आंबील बनवण्याचा निर्णय घेतला.” असे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी नीता अंजनकर यांनी उपस्थितांना “हा आजार कितीही मोठा असला तरी हसत खेळत राहावे,” असा प्रेरणादायी संदेश दिला.

रविवारी सकाळीच आंबील तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. विविडच्या विधी सुगंध, जलतज्ज्ञ प्रवीण महाजन, लेखक संजय नाथे, निर्मल अर्बनचे सीईओ राजेंद्र बरडे, डॉ. मोहन अंजनकर, अजय सराफ, स्वप्नील अहिरकर , वाघमारे मसालेचे सारंग वाघमारे, मुकुंद पात्रीकर यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन आंबीलचा आस्वाद घेतला

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

निवडणूक निरीक्षक नेहा चौधरी यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षास भेट

Mon Apr 29 , 2024
मुंबई :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या माध्यम व सनियंत्रण कक्षास 26- मुंबई उत्तर मतदारसंघासाठी नियुक्त खर्च विभागाच्या निवडणूक निरीक्षक नेहा चौधरी यांनी आज दुपारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हाधिकारी सुभाष काकडे, निवडणूक निरीक्षकांच्या संपर्क अधिकारी अनुपमा पाटील आदी उपस्थित होते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!