सातत्य हेच श्री सत्यसाई सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्याचे यश – पालकमंत्री संजय राठोड यांचे प्रतिपादन

– १०८ जोडपे एकाचवेळी चढले बोहल्यावर

यवतमाळ :- ‘मानव सेवा हीच माधव सेवा’ या भगवान श्री सत्यसाई बाबांच्या उपदेशाने प्रेरीत होऊन डॉ. प्रकाश नंदूरकर गेल्या ३० वर्षांपासून सर्वधर्मीय गरीब, गरजू कुटुंबातील मुला-मुलींचे विवाह लावून देतात. सातत्य आणि हाती घेतलेल्या काम प्रामाणिकपणे पूर्ण करण्याची इच्छाशक्ती असल्यानेच त्यांचे कार्य उत्तरोत्तर वाढत आहे, असे प्रतिपादन श्री सत्यसाई सामूहिक विवाह मेळावा आयोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. 

बंगलोर येथील साई मेरु मथी ट्रस्ट व सत चिकित्सा प्रसारक मंडळ यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी स्थानिक हॉटेल वेनिशियन येथे सत्यसाई सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षस्थानाहून संजय राठोड बोलत होते. कार्यक्रमास प्रमूख अतिथी म्हणून बंगलोर येथील द्वारकानाथ स्वामी, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू वेणू माधव जोशी, गुजरात येथील साई भक्त हसमुख पांचाळ, आयोजन समिती संयोजक डॉ. प्रकाश नंदूरकर आदिंची उपस्थित होते. पुढे बोलताना संजय राठोड यांनी, सत चिकित्सा प्रसारक मंडळ व त्यांच्या सदस्यांची, ते राबवीत असलेल्या या उपक्रमाबद्दल प्रशंसा केली. नवविवाहित जोडप्यांना आशीर्वाद देत सर्वांना शासकीय अनुदान व कन्यादान योजनेचा लाभ मिळवून देण्याची ग्वाही दिली.

या विवाह मेळाव्याचे मुख्य प्रवर्तक द्वारकानाथ साई यांनी वर-वधूंना आशीर्वाद दिले. आपण मन लावून भगवंताचे कार्य केल्यास ते कार्य ईश्वराचे होऊन जाते. मग त्या कार्यात कुठलीही बाधा येत नाही. म्हणून प्रत्येक कार्य हे ईश्वराचे कार्य आहे असे समजून करावे, असे प्रतिपादन त्यांनी केले. प्रमुख अतिथी कुलगुरू जोशी यांनी नवदाम्पत्यांना आशीर्वाद देत, हा सोहळा पाहून विलक्षण आनंद होत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक करताना संयोजक डॉ. प्रकाश नंदुरकर यांनी विवाह सोहळ्याची सुरुवात ते आतापर्यंतचा ३० वर्षाचा प्रवास मांडला. हे ईश्वरीय कार्य ईश्वराच्याच कृपेने घडून येत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

या सोहळ्यात सर्वधर्मीय १०८ जोडप्यांचा विवाह अतिशय थाटामाटात पार पडला. यावेळी नवविवाहित दांपत्यास मान्यवरांच्या हस्ते संसारपयोगी साहित्य भेट देवून सन्मानित करण्यात आले. मेळाव्याचे हे ३० वे वर्ष आहे. १९९४ पासून या सर्वधर्मीय विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. समाजातील सेवाभावी व दानशूर दात्यांच्या सहकार्याने हे कन्यादानाचे काम अखंड सुरू असून, आजवर दोन हजार २०० च्या वर विवाह पार पडले आहेत. रविवारी पार पडलेल्या विवाह सोहळ्यात सहभागी वर-वधूंना लग्नाचे कपडे, संसारोपयोगी वस्तू व वधूला सोन्याचे मंगळसूत्र भेट देण्यात आले. या विवाह सोहळयात एकूण १०८ विवाह लावण्यात आले. त्यात ३५ बौद्ध व ७३ हिंदू धर्माच्या जोडप्यांचा सामावेश आहे. दोन्ही धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे हे विवाह लावण्यात आले. मुंबई येथील साईराम अय्यर यांच्या गायनाचा कार्यक्रम या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरला.

अवास्तव लग्न खर्च, खर्चिक रूढी व परंपरा यातून सर्व- सामान्य कुटुंबाची सामुहिक विवाह सोहळ्यामुळे सुटका झाली. अनेक आई-वडील मुलामुलींच्या लग्नाकरिता कर्जबाजारी होण्याचे थांबले. आता मुलीचे लग्न ओझे वाटत नाही, असे मत सोहळ्यात सहभागी पालकांनी व्यक्त केले. या विवाह सोहळ्यासाठी इच्छुक वर, वधू शोधून आणणाऱ्या आशा सेविकांचा साडी व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शन जयंत चावरे यांनी केले. सोहळ्याला शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शरद पवार फिर चाणक्य हुए साबित

Tue Jun 11 , 2024
सवाल उठता है कि यह सब आखिर हुआ कैसे? जवाब यह है कि इस प्रदर्शन का असली प्रेम वरिष्ट नेता शरद पवार को जाता है. उन्होंने सचसे पहले वामदलों समेत राज्य की सभी छोटी पार्टियों और संगठनों को एकजुट कर अपनी ताकत बढ़ाई और वोटों का बंटवारा रोका लोकसभा चुनावों से पहले महाराष्ट्र में शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी) […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com