– महाराष्ट्र या उपक्रमाशी जोडला गेला हे आमचे भाग्य !
– कर्नल सुनील शेओरन यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती/फडणवीस यांनी घेतली भेट
– मुंबईवर 26/11 चा हल्ला झाला, त्यावेळी NSG तुकडीचे नेतृत्व करणारे कर्नल सुनील शेओरान यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट सुद्धा घेतली. कर्नल सुनील शेओरन यांचा बुलेट कॅचर म्हणून उल्लेख केला जातो. त्यांच्या कामगिरीचा विशेष गौरवपूर्ण उल्लेख यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केला.
लेह :-लेहमधील कारु येथे त्रिशुळ युद्ध संग्रहालयाच्या कामाचे भूमिपूजन आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. सुमारे 3 कोटी रुपये खर्च करुन हे संग्रहालय उभारण्यात येत असून, हा निधी महाराष्ट्र सरकारने दिला आहे. या संग्रहालयासाठी आणखी निधी लागला तर तो दिला जाईल. या उपक्रमाशी महाराष्ट्र जोडला गेला हे आमचे भाग्य आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
14 कोर कमांडर लेफ्टनंट जनरल रशीम बाली, मेजर जनरल पी. के. मिश्रा आणि आ. श्रीकांत भारतीय यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्रिशूळ हे उत्पत्ती, स्थिती आणि लयाचे प्रतीक आहे. त्रिशूळ हे शौर्याचे प्रतिक आहे. त्रिशूळ डिविजनने सुद्धा असेच शौर्य कायम दाखविले आहे. जेथे श्वास घेणे कठीण आहे, अशा ठिकाणी तुम्ही पराक्रम गाजवताय. आम्ही तुमच्या शौर्याला सलाम करतो. देशाचा सन्मान वाढविण्यात लष्कराची भूमिका अतिशय महत्वाची आहे आणि त्यात त्रिशूळ डिविजनचे योगदान महत्वपूर्ण आहे.
आज भारत सर्व क्षेत्रात प्रगती करतो आहे. चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यावर आता भारताने सूर्याची मोहीम हाती घेतली आहे. भारत आज जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. लष्करासाठी दुर्गम भागात रस्ते, पुल अशा सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण केले जात आहे. या संग्रहालयामुळे सीमावर्ती भागात पर्यटनाला सुद्धा मोठी चालना मिळेल आणि महाराष्ट्रातील पर्यटक येतील, तेव्हा त्यांना अभिमान वाटेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
सुमारे वर्षभरापूर्वी त्रिशुळ युद्ध संग्रहालयाची संकल्पना उदयास आली होती. महाराष्ट्रातील अॅड. मीनल भोसले आणि सारिका मल्होत्रा या दोन महिलांनी या भागात भेट दिली, तेव्हा या संकल्पनेचा उदय झाला. त्यांनी श्रीकांत भारतीय यांच्या कानावर हा विषय टाकला आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर यासाठीचे आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकारने घेतला. राज्य सरकारने हा निधी दिल्याबद्दल लेफ्ट. जनरल रशीम बाली, मेजर जनरल पी. के. मिश्रा यांनी यावेळी बोलताना महाराष्ट्र सरकारचे आभार मानले. लष्करी शाळेच्या विद्यार्थ्यांनी तसेच स्थानिक नागरिकांचा समावेश असलेला एक सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा यावेळी आयोजित करण्यात आला होता. त्रिशूळ युद्ध स्मारकानजीक हे संग्रहालय उभारण्यात येत असून, ते त्रिशुळाच्या आकाराप्रमाणे असणार आहे. यात तीन प्रदर्शन कक्ष असणार असून, त्यात 1962, 1965, 1971, 1991 आणि अगदी अलिकडच्या काळात झालेल्या कारवायांमधील शहीदांच्या स्मृती असणार आहेत.
हे त्रिशुळ डिविजन साहसी जवानांचे असून, एकिकडे पाकिस्तान तर दुसरीकडे चीन अशा दुहेरी क्षेत्रात भारताच्या अखंडतेसाठी ते कार्यरत असतात. या संग्रहालयात पाषणशिल्प, या त्रिशुळ डिविजनच्या स्थापनेचा इतिहास, विविध अभियानांमध्ये मिळालेले यश, युद्धात वापरलेले शस्त्र, दारुगोळा, वाहने, संपर्क व्यवस्था, जवानांनी कुटुंबीयांशी केलेला पत्रव्यवहार इत्यादी बाबी असणार आहेत. 1962 च्या युद्ध काळात या डिविजनची स्थापना करण्यात आली होती. आतापर्यंत 150 वीरता पुरस्कार या डिविजनला मिळालेले आहेत.