दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष शिबिर
नागपूर : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाद्वारे एडीआयपी आणि राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत दिव्यांग आणि ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत सहायक साधने वाटपासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे तपासणी शिबिर घेण्यात आले. रविवारी (ता.२७) विवेकानंद नगर येथील मनपाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराला महापौर दयाशंकर तिवारी, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, लक्ष्मीनगर झोन सभापती पल्लवी शामकुळे, नगरसेविका तारा (लक्ष्मी) यादव, नगरसेविका सोनाली कडू, वनिता दांडेकर, नगरसेवक लखन येरवार, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील कांबळे आदींनी भेट देऊन पाहणी केली.
शिबिरामध्ये प्रारंभी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचे आवश्यक कादगपत्रे तपासून नोंदणी करण्यात आली. नोंदणीनंतर दिव्यांग व ज्येष्ठांची संपूर्ण तपासणी करून त्यांना आवश्यक साहित्यासाठी पात्र असल्यास तशी पोचपावती देण्यात आली. ज्या दिव्यांगांना कृत्रिम हात, पाय अशा अवयवांची आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी विशेष तपासणी कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती. येथे दिव्यांगांना तपासणी करून त्यांना त्यांच्या आकारानुसार आवश्यक साहित्य प्रदान करण्याबाबत पोचपावती देण्यात आली.
तपासणी शिबिरामध्ये सहभागी झालेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांना योग्य आवश्यक साहित्य मिळावे यासाठी या महत्वपूर्ण पुढाकार आहे. नागपूर शहरातील सर्व पात्र व्यक्तींना लाभ घेता यावा यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे पुढाकार घेऊन प्रत्येक व्यक्तीला योजनांचा लाभ मिळावा यासाठी कटिबद्ध असल्याचे मत यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केले.