अनुभवावर आधारित मतांचा समृद्ध वारसा जपण्यातच प्रगतीची बिजे – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

नागपूर :- भारतीय संस्कृती व मानस एका भक्कम पायावर उभा आहे. आपली मते ही स्वानुभावावर आधारित ठेवण्यावर भर दिला आहे. विश्वासार्हतेला अधिक प्राधान्य आपण देत आलो आहोत. माहितीच्या या युगात विविध ॲप्स व संकेतस्थळाशी निगडीत समाजमाध्यमांवरील मत-मतांतरावर जर आपण आपली मते तयार करीत राहिल्यास आपण आपला समृद्ध वारसा हरवून तर बसत नाहीत ना, याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी केले.

नागपूर येथील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या वतीने कारवा या तीन दिवसीय उत्सवाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. यावेळी व्हीएनआयटीचे संचालक प्रा. पी.एम. पडोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘बाईटसची लढाई : माहिती युद्धात भारताची भूमिका’ या विषयावर साध्या भाषेत त्यांनी उकल करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

माहितीच्या या प्रस्फोटात प्रत्येक माहिती ही खरी असेलच हे सांगता येत नाही. अनेक चांगल्या गोष्टींबद्दल समाजमाध्यमांवर अनेक गैरसमज पसरविले जातात. अमेरिकेसारख्या अत्यंत प्रगत देशाला जे शक्य झाले नाही ती क्रांती आपण साध्या खेड्यातील बाजारात क्यु आर कोडच्या माध्यमातून आपले आर्थिक व्यवहार करण्याची किमया साध्य करून दाखविली आहे. भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशात आधारसारखी विश्वासार्ह व पूर्ण सुरक्षित प्रणाली निर्माण केली आहे. ही प्रणाली पूर्ण सुरक्षित आहे. तथापी याही बाबतीत साशंकता व्यक्त करून समाजात निर्माण केलेले संभ्रम हे प्रगतीला रोखणारे होते याची आपण प्रचिती घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

संपू्र्ण विश्वावर एक अपूर्व छाप भारतातील गुणवत्तेने निर्माण केली आहे. आपली मातृभाषा, संस्कृतीतून चालत आलेले आकलन व ज्ञान याला ब्रिटिशांनी छेद दिला. येथील नैसर्गिक साधनसंपत्तीची व्यापाराच्या नावाखाली मोठी लुबाडणुकही केली. याहीपेक्षा त्यांनी आपल्या सोबत आणलेल्या इंग्रजी भाषेच्या माध्यमातून ज्ञान रुजविण्याचा जो प्रयत्न केला तो आव्हानात्मक ठरला. इस्त्राईलसारखा छोटा देश लयास गेलेली आपली हिब्रू भाषा मोठ्या प्रयत्नांची शर्थ करून पुन्हा जिवंत करतो. या मातृभाषेच्या बळावर इस्त्राईलच्या हिब्रू विद्यापीठातील तब्बल 33 व्यक्ती नोबेलने सन्मानित होतात हे आपण विसरता कामा नये. याची आठवण त्यांनी करून दिली.

लोकशाही देशात प्रत्येकाच्या मताला जरूर अधिकार आहे. परंतु अभिव्यक्तीच्या नावाखाली जर ही मतमतांतरे चुकीच्या माहितीवर आधारित असतील किंवा ती जाणीवपूर्वक कुणाची फसवणूक करणारी असतील तर त्याला कायद्याच्या चौकटीत एक अटकाव असण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आपल्या शेजारी असलेल्या देशांमध्ये व इतरही देशांमध्ये समाजमाध्यमांवर व्यक्त होण्यावर शिस्तीचा बडगा उगारतात. तेथील कायदे याबाबतीत खूप कडक आहेत. जपान, जर्मन, फ्रान्ससारख्या देशात तेथील नागरिक अभिमानाने आपली मातृभाषा जवळ करतात. त्या भाषेला प्राधान्य देतात. गोपनीयतेचा सन्मान करतात. भारतातही आपण समाजमाध्यमांवर अभिव्यक्त होताना कायद्याला अभिप्रेत असलेली इतरांप्रतीची सभ्यता बाळगतो का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

आज भारतातील एक मोठा घटक समाजमाध्यमांशी, सोशल मीडियाशी जुळलेला आहे. यात चुकीची माहिती पसरविणारा सिंथेटिक मीडिया त्याच्या पूर्ण शक्तीने काम करीत आहे. युद्धाच्या काळात जाणीवपूर्वक चुकीच्या संदेशाचा रणनीतीसारखा केला जाणारा वापर आपल्याला नवा नाही. यापेक्षा परस्परांची विश्वासार्हता सत्याच्या आधारे वाढविणे याबद्दल सर्वांनी जागरूक असले पाहिजे. पारंपरिक मुल्यातून समृद्ध झालेली वसुधैव कुटुंबकम ही शिकवण जपली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण

Mon Apr 8 , 2024
मुंबई :- येत्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत. राज्यभरात एकूण २५४ मतदान केंद्राचे नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारसंघात दिव्यांगांसाठी मतदान केंद्रे असावीत यावर भर दिला असून ‘दिव्यांग नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ३० मतदान केंद्रांचे नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत. जळगावमध्ये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com