Ø नागपूर विभागातून ७ हजार ७४८ अर्ज
नागपूर :- राज्य शासनाने 65 वर्षे व त्यावरील जेष्ठ नागरिकांना मदतीचा हात म्हणून सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री वयोश्री’ या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत नागपूर विभागातून जास्तीत-जास्त पात्र जेष्ठ नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे. आतापर्यंत या योजनेंतर्गत विभागात 7 हजार 748 अर्ज प्राप्त झाले आहेत.
दैनंदिन आयुष्यात जेष्ठ नागरिकांना सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणाऱ्या अंतगत्व, अशक्तपणावर उपायोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य, साधने खरेदी करण्याकरिता तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र आदींद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधीत ठेवण्यासाठी, प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता या योजनेंतर्गत एकवेळ एकरकमी रुपये 3 हजार लाभार्थ्यांच्या बचत खात्यात थेट वितरीत करण्यात येते. नागपूर विभागात या योजनेंतर्गत 30 जुलै 2024 पर्यंत एकूण 7 हजार 748 अर्ज प्राप्त झाले असून यात सार्वधिक 4 हजार 278 अर्ज भंडारा जिल्ह्यातून प्राप्त झाले आहेत. नागपूर जिल्ह्यात 750, वर्धा 2 हजार 100, गोंदिया 354, चंद्रपूर 240 आणि गडचिरोली जिल्ह्यातून 26 अर्ज प्राप्त झाले आहेत. पात्र जेष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन बिदरी यांनी केले आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत पात्र जेष्ठ लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थतेनुसार चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हिल चेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खुर्ची, नी-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाईकल कॉलर खरेदी करता येतील. राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगा उपचार केंद्र, मन:स्वास्थ केंद्र, मन:शांती केंद्र , प्रशिक्षण केंद्र येथे जेष्ठांना सहभागी होता येणार आहे. 31 डिसेंबर 2023 रोजी वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या, आधार कार्ड असलेल्या व कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयाच्या आत असलेल्या जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
या योजनेंतर्गत लाभार्थ्यांची निवड, योजनेची अंमलबजावणी व देखरेख करण्याच्या उद्देषाने ग्रामीण भागाकरिता जिल्हाधिकारी व शहरी भागाकरिता महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या योजनेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण नागपूर या कार्यालयासोबतच जिल्ह्यांच्या सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास संपर्क साधता येणार आहे.