– विद्यार्थ्यांबरोबर शालेय कार्यक्रमही जात आहेत कॉन्व्हेंट कडे…..
कोदामेंढी :- मागील अनेक वर्षापासून जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत असून अनेक शाळा बंद झालेल्या आहेत तर काही शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. विद्यार्थी व पालकांच्या कल शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळेला पाठ फिरवून कानव्हेंटकडे वाढल्याने जिल्हा परिषद शाळेच्या डोळ्यात पाणी यायचे .मात्र आज जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावर आयोजित असलेला कार्यक्रमही शाळेच्या भौतिक असुविधेमुळे कॉन्व्हेंट कडे स्थानांतर झाल्याने आज जिल्हा परिषद शाळा अक्षरशा ढसाढसा रडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात युवा व्याख्याते व समाज परिवर्तनकार वसंत हंकारे यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यान आज 26 सप्टेंबर गुरुवार ला सकाळी 11 वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजक पंचायत समिती सभापती स्वप्नील श्रावणकर ,जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख ,पंचायत समिती सदस्य दीपक गेडाम, अनिल बुराडे व इतरांनी आयोजित केला.
पंधरा दिवसापूर्वी पासून या कार्यक्रमाच्या पोस्टर, बॅनर, सोशल मीडिया व दोन दिवसांपूर्वी वृत्तपत्राच्या आत पत्रके टाकून घरोघरी प्रचार करण्यात आला होता. मात्र कार्यक्रम ज्या ठिकाणी घेण्यात येणार होते त्या जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणाकडे आयोजकांचे संपूर्ण दुर्लक्ष होते. या शाळेतील पटांगणात पावसाळ्याच्या दिवसात पाणी साचत असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते व तेथे मुरूम टाकण्याची मागणी करणारे वृत्त विविध हिंदी व मराठी दैनिकांमध्ये पंधरा दिवसांपूर्वी प्रकाशितही करण्यात आले होते हे विशेष.
24 सप्टेंबर पासून वातावरण ढगाळ झाल्याने व 24 च्या रात्री पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने येथील पटांगणात खोलगट भागात पाणी साचला त्यामुळे त्या खोलगट भागात मुरूम टाकून तो पटांगण दुरुस्त करण्याऐवजी त्या शाळेत आयोजित असलेला कार्यक्रमच आयोजकांनी रद्द केला व जवळच असलेल्या रेड्डी कॉन्व्हेंट येथे तो कार्यक्रम आज घेण्यात आला.
सध्या पंचायत समिती मौदा व जिल्हा परिषद नागपूर येथे काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक हे सर्व काँग्रेसचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी आहेत .काँग्रेस का हात गरीबो के साथ असे म्हणत काँग्रेसचे उमेदवार निवडणुकीत जिंकून आले व सत्तेतही आलेत.अरोली- कोदामेंढी जिल्हा परिषद सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख हे सतत दोनदा या क्षेत्रातून जिंकून आले. मात्र गरिबांच्या लाडक्या जिल्हा परिषद शाळा यांच्या भौतिक सुविधेकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे आज दिसून आले.
जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांनी तरी आम्हाला हसवावे ,अशी मागणी आज ढसाढसा रडणाऱ्या जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने केली आहे.