‘आम्ही कमी पडलो म्हणून हारलो’, अजित पवार यांची माध्यमांसमोर पहिली प्रतिक्रिया

मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांसोबत बैठक घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. या निमित्ताने अजित पवार लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवावर प्रतिक्रिया दिली. “एनडीएला बहुमताचा आकडा गाठता आला आहे. जो काही निकाल लागला आहे त्यामध्ये आम्ही काही फार समाधानी नाहीत. या निकालाची सर्वस्व जबाबदारी माझी आहे हे मी मान्य करतो. कारण जनतेने दिलेला कौल आहे. आम्ही जनतेचा विश्वास संपादन करण्यात कुठेतरी कमी पडलो हे आम्हाला मान्यच करावं लागेल. जे काही अपयश आलं आहे त्याची जबाबदारी मी स्वत: स्वीकारली आहे”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

“आम्ही सर्वांना बोलवण्यामागील कारण म्हणजे आज सकाळी काही प्रमुख नेत्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत सर्व मंत्री होते, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, रामराजे निंबाळकर असे आम्ही सर्वजण बसलो होतो. आम्ही आज संध्याकाळी आमच्या सर्व आमदारांना एकत्र बोलावलेलं होतं. त्यातील काही जण त्यांच्या अडचणींमुळे येऊ शकले नाहीत. बाबा आत्रामांचं ऑपरेशन झालं आहे. कुणाच्या काही दुखद घटना घडल्या आहेत, अशा काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत. पण जे येऊ शकले नाहीत त्यांनी सुद्धा फोनवर संपर्क साधला”, असं अजित पवार यांनी सांगितलं.

‘बारामतीच्या निकाल पाहून मी स्वत: आश्चर्यचकीत’

“जे सातत्याने बातम्या देण्याचा प्रयत्न मीडियामध्ये पाहतोय, आमचे कुणीतरी विरोधक म्हणत आहेत की, यांनी संपर्क साधला, त्यांनी संपर्क साधला. असं काही झालेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. हे अतिशय स्पष्ट चित्र आज पाहायला मिळालं आहे. अर्थात विरोधकांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. मला बाकी लोकांच्याबद्दल काही बोलायचं नाही. पण बारामतीचादेखील जो कौल आहे तो कौल, जो काही निकाल लागला आहे त्याबद्दल मी स्वत: आश्चर्य झालेलो आहे. मलाही समजत नाही की, गेल्या अनेक वर्ष मी तिथे काम करतोय. बारामतीकरांनी मला नेहमी पाठिंबा दिलेला होता. यावेळेस कशामुळे त्यांनी मला पाठिंबा दिला नाही, बाकीचे मतदारसंघ तर बाजूलाच राहुद्या”, असं अजित पवार म्हणाले.

“शेवटी जनतेचा कौल असतो, तो कौल लोकशाहीत स्वीकारायचाच असतो. पुन्हा ना उमेद न होता लोकांसमोर जायचं असतं. मी कार्यकर्त्यांना नेहमीच सांगतो की, यश मिळालं म्हणून हुरळून जायचं नसतं तर किंवा अपयश मिळालं म्हणून खचून जायचं नसतं. पुन्हा नव्या उमेदीने सगळ्यांनी काही महिन्यांनी येणाऱ्या निवडणुकीत सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आमची साहजिकच महायुती आहे, या महायुतीत जे प्रमुख आहेत, त्यांच्याशी चर्चा करुन जागावाटप करु”, असं अजित पवारांनी सांगितलं.

Source by TV9 Marathi

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तृणमूल, उबाठा सत्तास्थापनेसाठी आग्रही, काँग्रेसची सावध भूमिका; चंद्राबाबू नायडू, कुमार इंडिया आघाडीत येणार?

Fri Jun 7 , 2024
नवी दिल्ली :- लोकसभा निवडणुकीच्या निकालात एक्झिट पोल्सच्या विपरित निकाल लागले असले तरी २४० जागा जिंकत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. जेडीयू आणि टीडीपी या पक्षांशी निवडणूकपूर्व आघाडी असल्यामुळे भाजपाला मित्रपक्षांच्या मदतीवर सरकार स्थापन करणे अवघड नाही. दुसरीकडे इंडिया आघाडीने मात्र सबुरीने घेत योग्य वेळी योग्य पाऊले उचलू, अशी भूमिका घेतली आहे. मात्र इंडिया आघाडीतील काही पक्ष विशेषतः तृणमूल काँग्रेस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com