संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- तालुक्यातील गुमथळा येथे मनोहर मोहोड यांच्या स्मृती प्रित्यर्थ बालमित्र दुर्गा क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित रात्रकालीन टेनिस थ्रो बॉल क्रिकेट स्पर्धेच्या सेमी फायनलच्या सामन्यात पंच,आयोजक आणि आजनी येथील नवयुवक युवा मंडळ यांच्या खेळाडूंत गैरसमजातून वाद होऊन हाणामारी झाली. अखेर नवयुवक युवा मंडळांच्या खेळाडूंनी मौदा पोलीस स्टेशन मध्ये जावून मारहाण कर्त्यांविरुद्ध रीतसर तक्रा नोंदवली आहे
कामठी तालुक्यातील गुमथळा येथे बालमित्र दुर्गा क्रिकेट क्लबच्या वतीने मनोहर मोहोड यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित रात्रकालीन टेनिस थ्रो बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन ३ जानेवारीला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. क्रिकेट खेळात आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळवलेल्या आजनी येथील नवयुवक युवा मंडळाने या स्पर्धेत सेमी फायनल पर्यंत मजल मारली. १५ जानेवारीला रात्री आठ वाजता सेमी फायनलमध्ये मौदा येथील संघासोबत सामना सुरू असतांना नवयुवक संघाचा बॉलर पारीचा शेवटचा ओव्हर टाकत असताना अंपायरने वाईड बॉल नसतांना त्यास वॉईड दिला असे नवयुवक संघाच्या खेळाडूंचे म्हणणे आहे. ओव्हर संपल्यानंतर बॉलर स्वतःवरच चिडून स्वतःशी पुटपुटत जात असतांना अंपायर धनू मालोदे यास वाटले की बॉलर त्यास शिवीगाळ करत असावा. या गैरसमजातून अंपायर नवयुवक संघाच्या खेळाडूस मारायला धावला. हे बघून नवयुवक संघाचे अन्य खेळाडू त्यास वाचविण्यास पुढे आले आणि त्यांनी मध्यस्थी केली असता दीपक वाघ, संतोष गिरी, रितिक गिरी व धनू मालोदे यांनी बॉलर सह अन्य मध्यस्थी करण्यास आलेल्या खेळाडूंना मारहाण केल्याची लेखी तक्रार नवयुवक युवा मंडळाच्या खेळाडूंनी मौदा पोलीस स्टेशनला केली आहे. मौदा पोलिसांनी दीपक वाघ, संतोष गिरी, रितिक गिरी व धनू मालोदे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करून घेत पुढील तपास सुरू केलेला आहे.
पोलिसांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता खेळ भावनेचा आदर न करता परगावावरून खेळण्यास आलेल्या अन्य मंडळाच्या खेळाडूंना मारहाण करणाऱ्या व तक्रार दाखल केलेल्यांवर लवकरात लवकर योग्य कारवाई करावी, अन्यथा उद्या अजून काही विपरीत घडले तर ती सर्वस्वी पोलिसांची जबाबदारी असेल अशी मागणी नवयुवक युवा मंडळाच्या खेळाडूंनी केली आहे.