तळमळीतूनच साहित्य व राजकीय नेतृत्वाची निर्मिती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Ø संमेलनाध्यक्षांना राज्य अतिथीचा दर्जा

Ø वर्धेत लाईट अँड साऊंडशोला मान्यता

९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन

वर्धा : जगण्याचे बळ देणारे साहित्यिक हे मुळात सामाजिक नेते असतात.जगण्याच्या तळमळीतून साहित्य आणि राजकीय नेतृत्व निर्माण होते. समाजाला दिशा देणाऱ्या या दोन्हींचे उगमस्थान साहित्यच आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्रातील दिग्गजांच्या मार्गदर्शनाचा व सूचनांचा राज्यशासन कायम आदर करीत आल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त येथील आचार्य विनोबा भावे सभामंडपात प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर आयोजित या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. संमेलनाध्यक्ष न्या.नरेंद्र चपळगावकर, शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, पूर्वाध्यक्ष भारत सासणे, स्वागताध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे, साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास आणि डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष तथा आयोजन समितीचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते आदि उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, वर्धा ही राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी आहे. हे दोन्ही महान नेते एक उत्तम लेखक होते. या प्रभावळीत लोकमान्य टिळक, महात्मा जोतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर,स्वातंत्र्यवीर सावरकर, अटलबिहारी वाजपेयी, यशवंतराव चव्हाण, प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आदी राजकीय नेते हे उत्तम लेखक होते. लोकसेवेचे व्रत घेवून या सर्व नेत्यांनी साहित्यातूनच आपल्या सामाजिक व राजकीय कार्याची मोट बांधल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राजकीय नेतृत्वाचे उगमस्थान साहित्य असल्याचे यातून अधोरेखित होते, त्यामुळे लोकसेवेच्या व्रताला बळ देण्यासाठी साहित्यिकांकडून राज्यकर्त्यांना मार्गदर्शन व्हावे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

मराठी साहित्य संमेलन हे सुदृढ सांस्कृतिक लोकशाहीचे विशाल रूप

मराठी भाषा ही चमत्कार घडविणारी आहे. संत साहित्य आणि साहित्याच्या विविध प्रवाहांनी या भाषेला समृद्ध केले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषेचा उत्सव साजरा होतो. हे संमेलन म्हणजे सुदृढ सांस्कृतिक लोकशाहीचे विशाल रूप असल्याचे गौरवोद्गारही श्री शिंदे यांनी काढले.मराठी भाषा संमेलनाची शतकाकडे होत असलेली वाटचाल ही गौरवाची बाब आहे. लक्षावधी सारस्वत या संमेलनासाठी महाराष्ट्र व देशातून दरवर्षी एकत्र येतात ही ओढ अद्भूत आहे. राज्याच्या ग्रामीण भागातून उत्तम लेखक व सकस साहित्य निर्माण होत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. शासकीय पातळीहूनही मराठी बोलीभाषेच्या संवर्धनासाठी कार्य करण्यात येत असल्याचे सांगत मराठी साहित्याच्या समृद्धीसाठी राज्यशासन सदैव पुढाकार घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मराठी भाषेची सेवा करणाऱ्या महाराष्ट्राबाहेरील संस्थांना संमेलनासाठी तसेच वारकरी संमेलनासाठी राज्य शासनाने प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी नागरी जीवनाबरोबरच ग्रामीण भागातील बदलांची साहित्यिकांनी नोंद घेण्याचे आवाहन करतांना समृद्धी महामार्गाचा उल्लेख केला. या महामार्गासारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे ग्रामीण व नागरी जीवनावर झालेल्या सकारात्मक बदलांचे प्रतिबिंब साहित्यात उमटावे,देश-विदेशातील विकासात्मक व प्रेरणादायी साहित्य मराठी भाषेत अनुवादित व्हावे, शासन यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.

संमेलनाध्यक्षांना राज्य अतिथीचा दर्जा

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना राज्य अतिथींचा (स्टेट गेस्ट) दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मराठी साहित्य मंडळाने राज्य शासनाकडे या संदर्भात मागणी केली होती, ती मागणी मान्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

वर्ध्यातील ‘लाईट, साऊंड ॲन्ड लेझर शो’ ची मागणी मान्य

वर्धा येथील साहित्य संमेलनात शहराच्या स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाला मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी सेवाग्राम मार्गावरील चरखा भवन येथे महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या मोठ्या प्रतिमा लावलेल्या ठिकाणी ‘लाईट, साऊंड अँड लेझर शो’ राज्य शासना मार्फत सुरु करण्यात यावा, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात वर्ध्याच्या वैभवात भर घालण्यासाठी सौदर्यीकरणाची ही मागणी मान्य करण्यात येत असल्याचे जाहीर केले.

मराठी भाषा मंत्री,दीपक केसरकर यांनीही यावेळी संबोधित केले. ते म्हणाले,साहित्यिक हे समाजाची ज्योत आहे, ही ज्योत तेवत ठेवण्यासाठी राज्य शासन सदैव पाठिशी आहे. मराठी साहित्याच्या विकासासाठी राज्य शासनाची प्रतिबद्धता असल्याचे सांगत त्यांनी साहित्य क्षेत्रात राज्य शासन हस्तक्षेप करणार नाही. सातारा जिल्ह्यातील वाई येथे मराठी विश्वकोष भवन आणि मुंबईत मराठी भाषा भवन बांधण्यात येत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी देण्यात येणारे अनुदान ५० लाखाहून वाढवून २ कोटी करण्यात आले. तसेच, विश्व साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठीचे अनुदान १० कोटींहून वाढवून १५ कोटी केल्याचेही त्यांनी सांगितले .

यावेळी दत्ता मेघे, पद्मश्री डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी,डॉ. कुमार विश्वास,न्या.नरेंद्र चपळगावकर, भारत सासणे, प्रदीप दाते आदिंची समयोचित भाषणे झाली. मुख्यमंत्र्यांच्याहस्ते संमेलनाध्यक्ष न्या.नरेंद्र चपळगावकर आणि पूर्वाध्यक्ष भारत सासणे यांचा सत्कार करण्यात आला. विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमिताने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘दौत लेखनी’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशनही मुख्यमंत्र्याच्या हस्ते झाले.

यावेळी आयोजन समितीच्यावतीने तयार करण्यात आलेल्या वर्धा गौरव गित, कविवर्य सुरेश भट यांच्या ‘लाभले आम्हास भाग्य…’ हे मराठी अभिमान गित आणि संमेलन गिताचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी तर आभार प्रदर्शन अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहंदळे यांनी केले.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

IHCL SIGNS A GINGER HOTEL, IT’S SECOND IN NAGPUR, MAHARASHTRA

Fri Feb 3 , 2023
 MUMBAI : Indian Hotels Company (IHCL), India’s largest hospitality company, today announced the signing of its second hotel under the Ginger brand in Nagpur, Maharashtra. The Brownfield project, a fully fitted lease is slated to open in April 2024. Speaking on the occasion, Suma Venkatesh, Executive Vice President – Real Estate & Development, IHCL said, “This signing is in line […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!