चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा ( कुष्ठरोग ) व ॲथलेटिक्स असोसिएशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजीत ” रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन ” स्पर्धा ३० जानेवारी रोजी पार पडली. सकाळी ६.३० वाजता गांधी चौक येथुन सुरु झालेल्या स्पर्धेत मुलींच्या गटातुन प्रथम बक्षीस आचल रमेश कडुकार, द्वितीय गौरी मधुकर नन्नावरे, तृतीय बक्षीस अभिलाषा संजीव भगत तर मुलांच्या गटातुन प्रथम बक्षीस रितिक दशरथ शेंडे, द्वितीय अनिल दिवाकर लोंडे तर तृतीय बक्षीस कृष्णा रामराव खोडबे यांनी पटकाविले.
१६ वर्षावरील युवक युवतींच्या या मॅरेथॉन स्पर्धेत जवळपास ८० स्पर्धक सहभागी झाले होते. तसेच माध्यमिक शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी, सर्वसामान्य नागरीक (महिला व पुरुष), कुष्ठरोगाबाबत कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, शासनाचे विविध विभाग, डॉक्टर संघटना यांचाही सहभाग होता.
स्पर्श कुष्ठरोग अभियाना अंतर्गत घोषवाक्य ” कुष्ठरोगाविरोधात लढा देऊन कुष्ठरोगाला इतिहास जमा करूयात ” हे घोषवाक्य ध्यानात ठेवुन रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन स्पर्धा पुरुष गटाकरीता गांधी चौक – जटपुरा गेट – प्रियदर्शिनी चौक – वरोरा नाका – जनता कॉलेज परत जनता कॉलेज – वरोरा नाका चौक – प्रियदर्शिनी चौक – जटपुरा गेट – गिरनार चौक ते गांधी चौक दरम्यान घेण्यात आली.
तर महिलांकरीता मॅरेथॉन स्पर्धा गांधी चौक – जटपुरा गेट – प्रियदर्शिनी चौक – वरोरा नाका परत वरोरा नाका – प्रियदर्शिनी चौक – जटपुरा गेट – गिरनार चौक दरम्यान घेण्यात आली. स्पर्धेचा समारोप गांधी चौक येथील मनपा मुख्य इमारतीसमोर करण्यात आला. या प्रसंगी मॅरेथॉन स्पर्धेतील प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या महीला व पुरुष गटातील स्पर्धकांना अनुक्रमे ४०००/-,२५००/- व १५००/- रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक बंडु रामटेके, सहाय्यक संचालक आरोग्य आरोग्य सेवा ( कुष्ठरोग ) संदीप गेडाम, मनपा आरोग्य विभाग वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.वनिता गर्गेलवार,अॅथलेटिक्स असोसिएशनचे सुरेश अडपेवार,डॉ. नयना उत्तरवार, डॉ. अश्विनी भारत, डॉ.विजया खेरा,डॉ.शरयू गावंडे, डॉ.जयश्री वाडे,डॉ.नरेंद्र जनबंधु उपस्थीत होते.