विकसित भारत संकल्पनेत युवकांनी सहभागी व्हावे  – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

– प्रधानमंत्री आणि राज्यपालांचा विकसित भारत@२०४७ निमित्त कुलगुरूंशी संवाद

– विकसित भारताच्या उभारणीसाठी विद्यापीठ, शैक्षणिक संस्थासह विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा – राज्यपाल रमेश बैस

मुंबई :- देशाच्या युवाशक्तीला दिशा देण्याची जबाबदारी सर्वांची आहे. नागरिकांच्या वैयक्तिक सहभागातूनच राष्ट्रउभारणी होते. विकसित भारताच्या संकल्पनेला प्राधान्य देऊन उद्दिष्ट पूर्तीसाठी विकसित भारत या संकल्पनेत युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

विकसित भारत @२०४७च्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील राज्यपाल, अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू, सार्वजनिक, खाजगी आणि अभिमत विद्यापीठांचे कुलगुरू, प्र कुलगुरू, कुलसचिव यांच्याशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला.

महाराष्ट्रात राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली विकसित भारत@२०४७ च्या संकल्पनांवर विचार-विमर्श करण्यासाठी राजभवन येथील दरबार हॉल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सर्व अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू, खाजगी विद्यापीठ, अभिमत विद्यापीठांचे कुलगुरू, प्रकुलगुरु, शैक्षणिक संस्था प्रमुख उपस्थित होते.

दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, विकसित भारताच्या उभारणीत ‘विकसित भारत@२०४७’ यामध्ये ‘व्हॉइस ऑफ यूथ’ (Viksit Bharat@2047: Voice of Youth) हे व्यासपीठ (प्लॅटफॉर्म) उपलब्ध करुन दिले आहे. विकसित भारत संकल्पनेवर सामूहिक विचार करण्यासाठी हा मंच उपलब्ध आहे. युवाशक्तीमध्ये विचारांची विविधता असून या उपक्रमाचा उद्देश विकसित भारताच्या निर्मितीसाठी तरुणांनी एकत्रित असणे गरजेचे आहे. यामुळेच या उपक्रमात युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, आणि विकसित भारतासाठी आपले योगदान द्यावे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, आपले ध्येय,संकल्प विकसित भारतासाठी असले पाहिजे, याद्वारे सुसंस्कारित, बुद्धिमान, अशी युवा पिढी तयार होईल आणि आगामी काळात देशाचे नेतृत्व करेल, देशाला योग्य दिशा देईल. डिजिटल इंडिया, स्वच्छता अभियान यासह कोरोना काळ आपण पहिला आहे. युवा शक्तीमध्ये परिवर्तन करण्याची ताकद आहे. देश उत्तुंग भरारी घेत आहे. अनेक देशांनी योग्य वेळेत जलद बदल करुन त्या ठराविक कालावधीत देशाचा विकास केला आहे. भारतासाठीसुद्धा आता हीच योग्य वेळ आहे. अमृत काळाच्या प्रत्येक क्षणी आपल्यापुढे भारताला विकसित देश म्हणून उभे करण्याचाच ध्यास असला पाहिजे. असेही प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

विकसित भारत @२०४७’ संकल्पनेत प्रत्येकाने आपल्या विचारांच्या कक्षा ओलांडून परिघाबाहेरील वेगळा विचार करावा. विकसित भारतासाठी उपयुक्त सूचना पाठविण्याचे आवाहन करण्यात आले असून पाठवलेल्या सूचनांची निवड करून पहिल्या दहा चांगल्या सूचना मांडणाऱ्या व्यक्तींना विशेष सन्मानित करण्यात येईल, असेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

विकसित भारताच्या उभारणीसाठी शैक्षणिक संस्थासह विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा – राज्यपाल रमेश बैस

राज्याला ज्ञान आणि शिक्षणाचा समृद्ध वारसा लाभला आहे. राज्यातील विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्था शिक्षणाच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करीत आहेत. २०४७ पर्यंत विकसित भारत होण्यासाठी विद्यापीठ, शिक्षण संस्थांसह विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा असल्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी सांगितले.

समाज आणि राष्ट्रासाठी विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांनी लोकाभिमुख वार्षिक महोत्सव आयोजित करावे. शिक्षण प्रणालीमध्ये नाविन्यपूर्ण कल्पना, नवनवीन उपक्रम यांचा वापर करणे गरजेचे आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणीमध्ये एक बेंचमार्क ठरावा, अशा सूचनाही राज्यपालांनी यावेळी केल्या.

आज देश अनेक क्षेत्रात प्रगती करीत आहे. आशियाई खेळांमधील कामगिरी, जन-धन खाती, कोविड काळात लसींचा विकास, चांद्रयान मिशन, टीबी नियंत्रण, डिजिटल पायाभूत सुविधांची निर्मिती यामध्ये उत्तम कामगिरी केली आहे. तसेच जी-२०शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनामुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावली आहे. जपान, जर्मनी, सिंगापूर आणि दक्षिण कोरियासारख्या देशांनी महान राष्ट्र बनण्यासाठी मोठी झेप घेतली असून भारतासाठी हीच योग्य वेळ आहे. भारताला २०४७ पर्यंत विकसित भारत बनवण्यासाठी सर्वांनी सहभाग द्यावा, असे आवाहनही राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी केले.

विकसित भारत संकल्पनेचे लोकचळवळीत रूपांतर व्हावे – केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव काळात देशाच्या विकासासाठी नवीन दृष्टिकोन समोर ठेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रा अभियान सुरू केले आहे. विकसित भारत संकल्प यात्रेचे लोकचळवळीत रूपांतर होणे गरजेचे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्यलढ्यात सर्व समाजघटकांनी सहभाग घेतला होता. तसाच सहभाग विकसित भारत उपक्रमात द्यावा.

जी-२० परिषदेच्या माध्यमातून प्रधानमंत्री यांनी ‘वसुधैव कुटुम्बकम’ असा संदेश जगाला दिला आहे. समाजकारण, राजकारण, अर्थकारण, यामध्ये नवीन दृष्टिकोन देण्यासाठी विकसित भारत अभियानाच्या माध्यमातून युवकांनी, शिक्षणसंस्थांनी आपली वेगळी ओळख निर्माण करावी, असे श्री.प्रधान यांनी सांगितले. चर्चासत्रात शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी विकसित भारत संकल्पना यावर विचार मांडले. चर्चासत्र झाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांसाठी 1 हजार 690 कोटी रुपयांचे पीकविम्याचे वितरण - मंत्री धनंजय मुंडे

Mon Dec 11 , 2023
नागपूर :- राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले, त्याबाबत प्रधानमंत्री पीकविमा योजना अंतर्गत 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना 2216 कोटी रुपये इतका अग्रीम पीकविमा 25 टक्के प्रमाणे मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी 1690 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले असून उर्वरित रुपयांचे वितरण वेगाने सुरू आहे, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com