उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात

– शेतकऱ्यांपर्यंत वीज पोहचविण्यासाठी २७७३ कोटींच्या कामांचा शुभारंभ

सोलापूर :- राज्यातील २४२ शासकीय व सहकारी उपसा जलसिंचन योजनांच्या सौर ऊर्जीकरण प्रकल्पांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोलापूर येथे करण्यात आले. त्याचसोबत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतील वीज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पायाभूत वीज वितरण यंत्रणेच्या सक्षमीकरण व विस्तारीकरणासाठी २७७३ कोटी रुपयांच्या विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमाला आ. सुभाष देशमुख, आ. विजय देशमुख, आ. शहाजी पाटील, आ. संजयमामा शिंदे, आ. समाधान आवताडे, आ. सचिन कल्याणशेट्टी आणि आ. राम सातपुते, माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आणि महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपसा जलसिंचन योजनांना सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा व्हावा आणि किफायतशीर दरात वीज उपलब्ध व्हावी यासाठी या योजनांचे सौर ऊर्जीकरण करण्याच्या कामाला आज सुरुवात झाली. यासाठी राज्य सरकारने ३३६६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. उपसा जलसिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण करण्यासाठी राज्याचा ऊर्जा विभाग, महावितरण आणि जलसंपदा विभाग सहकार्याने काम करत आहे. जलसंपदा विभागाने सौर ऊर्जीकरण प्रकल्पांसाठी साडेतीन हजार एकरपेक्षा अधिक जमीन उपलब्ध करून दिली आहे. या योजनेत ९०५ मेगावॅट इतकी सौर ऊर्जानिर्मिती क्षमता निर्माण होणार आहे.

टेंभू, जिहे कठापूर, ताकारी, लोअर वर्धा, अप्पर प्रवरा अशा सर्व लहानमोठ्या उपसा सिंचन प्रकल्पांना आता सौर ऊर्जेद्वारे निर्माण झालेली वीज उपलब्ध केली जाईल. विशेष बाब म्हणजे १२० सहकारी उपसा सिंचन योजनांचेही सौर ऊर्जीकरण या योजनेत करण्यात येणार आहे. आगामी दोन वर्षात ही कामे पूर्ण होतील. राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातील आणि सिंचन क्षेत्रातील हे ऐतिहासिक पाऊल आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत सध्या ९२०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. या योजनेतून मोठ्या प्रमाणात वीज निर्माण होणार आहे. शेतकऱ्यांपर्यंत वीज पोहचविण्यासाठी आरडीएसएस योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा बळकटीकरण करण्यासाठी शासनाने ३००० कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण व उत्तर महाराष्ट्रातील १६९७ कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ आज झाला. यामध्ये ९० नवी वीज उपकेंद्रे उभारणे, २३८ ठिकाणी पॉवर ट्रान्सफॉर्मर क्षमता वाढ आणि १,७०५ किलोमीटर लांबीच्या ३३ केव्हीच्या उच्च दाब वाहिन्या बसविणे अशा कामांचा समावेश आहे.

याखेरीज एआयआयबी योजनेअंतर्गत १०७६ कोटी रुपयांची पायाभूत सुविधा बळकटीकरणाची कामेही सुरू करण्यात येत आहेत. त्यामध्ये ६० नवीन वीज उपकेंद्रे, ३१ पॉवर ट्रान्सफॉर्मर क्षमतावाढ, १४३३ किलोमीटर लांबीच्या ३३ केव्हीच्या उच्च दाब वाहिन्या बसविणे, अशीही कामे हाती घेण्यात येत आहेत.

या कार्यक्रमात सोलापूर तालुक्यातील महिला शेतकरी महानंदा तेली व द्वारकाबाई गुरव यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेतून कृषिपंपांचे वीजबिल शासनाने भरल्याची पावती उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी महावितरणचे कार्यकारी संचालक सुनील पावडे, पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता अंकुश नाळे आणि अधीक्षक अभियंता सुनील माने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते 70 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान

Wed Oct 9 , 2024
– मिथुन चक्रवर्ती ‘दादासाहेब फाळके पुरस्काराने’ सन्मानित नवी दिल्ली :- 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आज विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते आज आयोजन करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना ‘दादासाहेब फाळके जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विज्ञान भवनात 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी केंद्रीय माहिती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!