30 हजार लाडक्या बहिणींनी पोस्ट पेमेंट्स बॅंकेत उघडले खाते

Ø मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

Ø खात्यासाठी केवळ मोबाईल व आधारची गरज

Ø केवळ 5 मिनीटात उघडले जाते खाते

यवतमाळ :- राज्य शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात प्रतिमाह 1 हजार 500 रुपयांचे अर्थसहाय्य जमा केले जाणार आहे. त्यासाठी महिलांचे बॅंक खाते असणे आवश्यक आहे. बॅंक खाते नसलेल्या तब्बल 30 हजार लाडक्या बहिणींनी अवघ्या काही दिवसांत इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेत खाते उघडले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत 21 ते 65 वयोगटातील आणि कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजाराच्या आत असलेल्या महिलांना आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर योजनेचा लाभ दिला जाणार आहे. लाभाची रक्कम प्रतिमाह केवळ बॅक खात्याद्वारे अदा केली जाणार आहे. योजनेसाठी महिलांच्या नावांची नोंदणी जिल्हाभर मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. नोंदणी करतांना महिलांना बॅंक खात्याची झेरॅाक्स प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे.

पोस्ट पेमेंट बॅंकेत अगदी काही वेळात आणि सहजपणे खाते उघडल्या जात असल्याने महिला हे खाते उघडण्याला पसंती देत आहे. भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे जाळे संपुर्ण जिल्ह्यात अगदी गाव पातळीपर्यंत पसरलेले आहे. जिल्ह्यात सुमारे 404 पोस्ट ऑफिस आहे. त्यात 363 ग्रामीण भागात तर 40 शहरी भागात कार्यरत आहे. या सर्व पोस्ट कार्यालयातून इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे कार्य चालते. या बॅंकेत अवघ्या 5 मिनिटात आधार सीडेड खाते काढता येते.

जिल्ह्यातील सर्व पोस्टमनकडे डिपार्टमेंट मोबाईल आणि बायोमेट्रिक मशीन देण्यात आलेल्या आहेत. या मशिनच्या आधारे लाभार्थ्यांची अंगठा लावून पडताळणी केली जाते आणि खाते उघडून दिले जातात. खाते काढण्यासाठी पोस्ट पेमेंट्स बॅंकेत कोणत्याही प्रकारचे कागदपत्र द्यावे लागत नाही, फक्त आधार क्रमांक आणि मोबाईल सोबत असावा लागतो. जिल्ह्यात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे जवळपास 3 लाख 50 हजारापेक्षा जास्त ग्राहक आहेत. त्यात आता 30 हजार लाडक्या बहिणींची भर पडली आहे.

खाते अन्य योजनेसाठीही उपयुक्त

इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेचे खाते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त पीएम किसान योजना, रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना, ज्येष्ठ नागरिकांना निराधार योजना इत्यादीसाठी उपयुक्त आहे. लाडकी बहीण योजनेसाठी शासनाने देखील पोष्ट पेमेंट्स खात्याला मान्यता दिली असून महिलांनी खाते काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मानसेवी होमगार्ड सदस्य नोंदणीचे आयोजन

Thu Jul 25 , 2024
यवतमाळ :- जिल्ह्यातील पथक, उपपथकामधील पुरुष, महिला होमगार्डची सदस्य नोंदणी दि. 28 ऑगस्ट रोजी पोलिस कवायत मैदान, पळसवाडी, यवतमाळ या ठिकाणी घेण्यात येणार आहे. होमगार्डसाठी ईच्छूकांनी दि.26 जुलै ते 17 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दि. 28 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजतापासून नोंदणी घेण्यात येणार आहे. होमगार्ड नोंदणी पात्रतेसाठी शिक्षण कमीत कमी 10 वी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com