– महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाच्या वतीने सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमात
– हजारो योग साधकांची उपस्थिती
नागपूर :- मानवी जीवनात योगासनाचे अनन्यसाधारण महत्व आहे. निरोगी व आनंददायी जीवन जगण्यासाठी तसेच शारीरिक व मानसिक सुदृढ आरोग्यासाठी नियमितपणे योगसाधना करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. जागतिक योग दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात हजारों नागरिकांनी सामूहिक योगाभ्यास केला.
नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनानिमित्त आज शुक्रवारी २१ जून रोजी सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन धंतोली स्थित यशवंत स्टेडियम येथे करण्यात आले होते. यावेळी गडकरी बोलत होते.
मंचावर आमदार कृष्णा खोपडे, आमदार टेकचंद सावरकर, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अतिरिक्त मनपा आयुक्त अजय चारठानकर, प्रसिद्ध आहारतज्ञ डाँ. जगन्नाथ दीक्षित, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, मनपा उपायुक्त मिलिंद मेश्राम, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे प्रमुख रामभाऊ खांडवे, जयप्रकाश गुप्ता, राजेश बागडे यांच्यासह मोठ्या संख्येने योग अभ्यासक, युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक, एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
गडकरी पुढे म्हणाले की, आजची आपली जीवनशैली पूर्णपणे बदललेली आहे. आज प्रत्येकाला ताण-तणावाला सामोरे जावे लागते. त्यामुळे तणावमुक्त राहण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या जीवनशैलीमध्ये योगसाधनेचा समावेश करणे आवश्यक आहे. योग हा फक्त व्यायाम नसून योगामुळे शारिरीक, मानसिक आरोग्य सुदृढ राहते. नियमित योगासने केल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते. योगामुळे मन:शांती तर मिळतेच शिवाय तणाव दूर होऊन एकाग्रता सुध्दा वाढण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येकाने निरोगी जीवन जगण्यासाठी योगसाधना करणे आवश्यक आहे. योगाच्या माध्यमातून आज रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
तत्पूर्वी, कार्यक्रमाच्या प्रारंभी शालेय विद्यार्थ्यांनी योगासनाची लक्षवेधक सामूहिक प्रात्यक्षिके सादर केली. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे प्रमुख रामभाऊ खांडवे यांनी निरोगी जीवनासाठी योगाचे आपल्या जीवनातील अनन्यसाधारण महत्व विशद केले.
कार्यक्रमात मनपाचे मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त प्रकाश वराडे, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. विजय जोशी, सहायक आयुक्त सर्वश्री गणेश राठोड, नरेंद्र बावनकर, प्रमोद वानखेडे, कार्यकारी अभियंता विजय गुरुबक्षाणी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी देखील योगसाधना केली. कार्यक्रमात मनपा व नागपूर जिल्हा प्रशासनाला जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, नागपूर योग असोसिएशन, अमित स्पोर्ट्स अकादमी आदींचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी तर आभार क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर यांनी मानले.