नवी दिल्ली :- आयसीडी 11 या पारंपरिक वैद्यकीय मॉडयूल 2 ची सुरुवात करत, आज जागतिक आरोग्य संघटनेने त्याच्या अंमलबजावणीची तयारी सुरू केली आहे. आयुर्वेद, सिद्धा आणि युनानी चिकित्सा पद्धतीच्या आधारावर, आजारांची माहिती आणि संज्ञांचा आता जागतिक आरोग्य संघटनेच्या आयसीडी -11 वर्गीकरणात समाविष्ट करण्यात आला आहे. या प्रयत्नांमुळे, आयुर्वेद, युनानी आणि सिद्धा चिकित्सा पद्धतीनुसार, आजारांची जी नामावली किंवा संज्ञा असते, तिला एक कोड देण्यात आला असून, त्यांचा समावेश, आरोग्य संघटनेच्या आजार वर्गीकरण मालिकेत करण्यात आला आहे.
आयुष मंत्रालयाने, जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने, आयुर्वेद, सिद्धा आणि युनानी चिकित्सा पद्धतीत, वापरल्या जाणाऱ्या नामावलीनुसार, आयसीडी 11 मालिकेच्या टी एम मॉडयूल अंतर्गत, वर्गीकरण केले आहे.
या वर्गीकरणासाठी यापूर्वी जागतिक आरोग्य संघटना आणि आयुष मंत्रालय यांच्यात देणगीदार करारावरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. या प्रयत्नामुळे भारताची आरोग्य सेवा वितरण प्रणाली, संशोधन, आयुष विमा संरक्षण, संशोधन आणि विकास, धोरण निर्मिती प्रणाली अधिक बळकट आणि विस्तारित होईल. याशिवाय, या संहितांचा उपयोग समाजातील विविध रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भविष्यातील धोरणे तयार करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.
केंद्रीय आयुष आणि महिला व बालविकास राज्यमंत्री डॉ. मुंजपरा महेंद्रभाई यांनी आज, इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे आयसीडी-11, टीएम मॉड्यूल-2 चा शुभारंभ केला. आयुष चिकित्सा भारतातील तसेच जगभरातील जागतिक मानकांसह एकत्रित करून त्याचे आधुनिकीकरण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
आयसीडी-11 मध्ये पारंपरिक वैद्यकीय संज्ञांचा समावेश हा पारंपरिक औषध आणि जागतिक मानकांमधील दुवा आहे, असेजागतिक विकास संघटनेचे, भारतातील प्रतिनिधी डॉ. राडारिको एच. ऑफ्रिन यावेळी म्हणाले.
ब्राझील, बांगलादेश, मलेशिया, मॉरिशस, श्रीलंका, नेपाळ, इराण आणि ब्रिटनसह डब्ल्यूएचओच्या सदस्य देशांच्या प्रतिनिधींनी यावेळी, आपापल्या देशांमधील पारंपरिक औषधाच्या सद्यस्थितीबाबत आपले अनुभव मांडले.