नागपूरला देशातील सर्वोत्तम शहर बनवणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत क्रेडाई नागपूर मेट्रोच्या नवीन कार्यकारणीचे पदग्रहण  

नागपूर :- पिण्याच्या पाण्याची सोय, आंतरराष्ट्रीय मानकानुसार घनकचरा व्यवस्थापन, मेट्रो टप्पा-2 व्दारे लगतच्या शहरांना जोडणे, शहराला लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून विकसित करणे, शहराला खड्डेमुक्त करणे आदी उपाययोजनांद्वारे नागपूरला देशातील सर्वोत्तम शहर बनवण्याचा मानस, आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.

येथील सेंटर पाँईट हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत क्रेडाई नागपूर मेट्रोच्या वर्ष 2023-25 साठी नवनियुक्त कार्यकारणीचा पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर , महानगर पालिका आयुक्त राधाकृष्ण बी., क्रेडाई नागपूर मेट्रोचे अध्यक्ष गौरव अग्रवाला, महासचिव एकलव्य वासेकर, कोषाध्यक्ष आशिष लोंढे मंचावर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मागील दशकापासून नागपूर शहर बदलत आहे. या शहराने नुकताच सौंदर्यीकरण व स्वच्छतेसाठी राज्यातील पहिला पुरस्कार पटकाविला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात या शहरासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शहरात पिण्याच्या पाण्याची योजना अंतिम टप्प्यात आहे. मलनि:सारणात नागपूर शहर अन्य शहरांच्या पुढे आहे. नुकताच महानगर पालिकेने स्विडीश कंपनी सोबत करार केला असून येत्या 18 महिन्यात आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे नागपूर शहरात घनकचरा व्यवस्थापनाचे कार्य सुरू होणार, असल्याचेही त्यांनी सांगितले.

रियल इस्टेट क्षेत्रामुळे रोजगाराची मागणी निर्माण होत असते. म्हणूनच सरकाचेही या क्षेत्राकडे लक्ष आहे. नागपुरात जवळपास 40 कि.मी. परिसरात मेट्रोरेल्वेचे जाळे निर्माण झाले आहे. मेट्रो टप्पा-2 व्दारे लगतच्या उपनगरीय भागाला जोडण्यात येणार आहे. अन्य क्षेत्रांप्रमाणे रियल इस्टेट क्षेत्रालाही याचा फायदा होणार आहे. वाळूचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन उपाययोजना राबवणार आहे. यामुळे सर्वांना वाळू उपलब्ध होईल. भारतात आणि महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात उद्योग येत आहेत. यासाठी भौगोलिकदृष्ट्या केंद्रस्थानी असलेल्या नागपूर शहराला लॉजिस्टीक कॅपिटल म्हणून विकसित करण्यात येणार, असल्याचेही  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर दोन धावपट्टया सुरू करणार तसेच येत्या काळात उत्तमोत्तम रस्ते निर्मिती करून नागपुरात खड्डे मुक्त शहराची संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे  फडणवीस म्हणाले. त्यांनी क्रेडाई नागपूर मेट्रोच्या नवीन कार्यकारणीला जोमाने काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते क्रेडाई नागपूर मेट्रोच्या नवीन कार्यकारीणी सदस्यांचा सत्कार करण्यात आला. निवर्तमान अध्यक्ष विजय दर्गण आणि नवनियुक्त अध्यक्ष गौरव अग्रवाला यांनी उपस्थितांना संबोधित केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Chief Minister Eknath Shinde conducts urgent meeting for resolving traffic congestion in Thane city

Mon Apr 24 , 2023
Mumbai :- Chief Minister Eknath Shinde on Saturday night conducted an urgent meeting for discussing the measures to work on the congestion of traffic in Thane city. The officials of police department, transportation department and Public Works Department attended the meeting. The Chief Minister directed to complete all the ongoing developmental works in the Thane city before 1 June 2023, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!