“ब” वर्ग तीर्थक्षेत्रांचा विकासनिधी वाढवून ५ कोटी केल्याबद्दल वारकरी बांधवांनी मानले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार

मुंबई :- महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भरणाऱ्या यात्रा-जत्रांना भाविकांच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. या तीर्थक्षेत्रांना वर्षभर भेटी देणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील “ब” वर्ग तीर्थक्षेत्रांच्या परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने निधीची मर्यादा २ कोटी रुपयांवरून ५ कोटी रुपये इतकी वाढविली आहे. राज्यातील आध्यात्मिक क्षेत्राच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतल्याबद्दल अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप प्रकाश बोधले महाराज यांच्यासह वारकरी संप्रदायातील प्रमुख महाराजांनी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांची आज भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

महाराष्ट्राला तीर्थक्षेत्रांची, संत-महात्म्यांची समृद्ध परंपरा लाभली आहे. या तीर्थक्षेत्रांचा विकास करतानाच याठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविक-भक्तांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनातर्फे भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यादृष्टीने मोठ्या ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांच्या विकासाकरिता “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजना” सुरु करण्यात आली आहे. याअंतर्गत अ-वर्ग तीर्थक्षेत्रांसाठी निधीची मर्यादा ‘२ कोटी रूपये ते २५ कोटी रूपये’ वरून ‘५ कोटी रूपये ते २५ कोटी रूपये’ इतकी वाढविली आहे. तसेच, लहान ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांच्या विकासाकरिता ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना ब-वर्ग साठीच्या निधीची मर्यादा २ कोटी रुपयांवरून ५ कोटी रुपये इतकी वाढविली आहे. या निर्णयामुळे राज्याच्या आध्यात्मिक विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे, असे मत वारकरी बांधवांनी यावेळी व्यक्त केले.

राज्यातील तीर्थस्थळे हा समाजाचा भावनात्मक ठेवा आणि आध्यात्मिक संस्कार केंद्रे आहेत. त्यामुळे शासनाने वारकरी बांधवांनी केलेल्या मागणीचा भावनात्मक आणि व्यावहारिक पातळीवर विचार करून धाडसी निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीमुळे तीर्थक्षेत्रांचा पर्यटनदृष्ट्या देखील विकास होणार आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे ४७९ ब वर्ग देवस्थानांना होणार आहे. त्यामुळे ब वर्ग तीर्थक्षेत्रावर येणारा प्रत्येक भाविक आपले मनापासून आभार मानत आहे, अशी सामूहिक भावनाही वारकरी बांधवांनी यावेळी व्यक्त केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दक्षिण-पश्चिम नागपूरातील “शासन आपल्या दारी” शिबिराचे उद्घाटन

Fri Mar 1 , 2024
नागपूर :- सर्वसामान्य जनतेला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन आपल्या दारी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांर्तगत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मतदारसंघ असणाऱ्या दक्षिण-पश्चिम नागपूरातील रामदासपेठ येथील मेजर आनंद खरे लेंड्रापार्क येथे गुरुवारी (ता२९) शासन आपल्या दारी विशेष शिबिराचे उदघाटन करण्यात आले. नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा एकाच छताखाली लाभ घ्यावा तसेच शिबिराला मोठ्या संख्येत भेट द्यावी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com