अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या स्थापनेपासून आजतागायत विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासात नुटा संघटनेने आपले महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकांच्या प्रश्नांबाबत सनदशीर लढाई लढत असतांना नुटा संघटनेने सदैव विद्यापीठाच्या शैक्षणिक विकासामध्ये भरीव व मोलाची कामगिरी केलेली आहे. नुटा संघटनेचे संस्थापक व मार्गदर्शक माजी आमदार प्रा.बी.टी. देशमुख यांनी अंत्यत अनुशासन व कटीबध्दता ठेवून नुटा संघटनेचे संवर्धन व संगोपन करुन ही संघटना नावारुपास आणलेली आहे. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचा आधारवड असलेली नुटा संघटना आजही त्याच जिद्दीने व जोमाने कार्य करत आहे. प्रा.बी.टी.देशमुखांनी अमरावती जिल्हातील पाणी प्रश्न असो किंवा समाजातील विविध घटकांचे शैक्षणिक संबंधातील प्रश्न असो, याबाबत अंत्यत अभ्यासपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतलेले आहे. विद्यापीठातील कामकाजात महत्वाचे असलेले कायदे एकजुटीने किंवा आर्थिक बाबींशी निगडित असणारे विविध विषय, विद्यापीठाचे अर्थसंकल्पीय बजेट, विद्यार्थी, कर्मचारी व शिक्षकांचे असणारे प्रश्न आदी नुटा संघटनेच्या माध्यमातून त्यांनी धसास लावलेले आहे.
नुटाचे विद्यमान अध्यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी आणि एमफुक्टोचे उपाध्यक्ष प्रा. विवेक देशमुख व इतरही अभ्यासक नुटा संघटनेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील विविध घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत असतात. आंदोलन काळातील शिक्षकांच्या 73 दिवसांच्या वेतनाचा प्रश्न नुटा संघटनेने प्रदिर्घ लढा देवून सोडवलेला आहे. ‘‘अन्यायाविरुध्द एल्गार’’ हा नुटा संघटनेचा मूलमंत्र असून व्यक्तिगत प्रश्नांपेक्षा समूहांच्या प्रश्नांसाठी लढाई हे तत्व नुटा संघटनेने आजतागायत जपलेले आहे. असंख्य सामान्य कार्यकर्ते याच संघटनेच्या तालमीत तयार झालेले असल्यामुळे इतरांमध्ये सुद्धा ती प्रेरणा जागृत अवस्थेत आहे. प्राधिकरणीच्या विविध क्षेत्रात काम करीत असताना आम्ही हे प्रत्यक्षात अनुभवले आहे.
आजही संघटनेला मानणारा विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांचा मोठा वर्ग संघटनेच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. त्यामुळे विद्यापीठ अधिसभेच्या निवडणुकीत नुटा संघटनेला नेत्रदिपक यश प्राप्त होईल, असा विश्वास माजी सिनेट सदस्य व नोंदणीकृत पदवीधर मतदार संघातील उमेदवार बाळासाहेब यादगिरे यांनी व्यक्त केला आहे.