– शेती स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षांकडून आढावा
यवतमाळ :- नापिकी आणि कर्जबाजारीपणासोबतच शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यापासून शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक आहे. त्यामुळे विभागांनी शेतकऱ्यांसाठी काम करत असतांना त्यांचा आर्थिक भार कमी कसा होईल यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावे, असे निर्देश वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड.निलेश हेलोंडे पाटील यांनी दिले.
महसूल भवन येथे अध्यक्षांनी शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजना, उपक्रमांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त विजय रहाटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.एस.एस. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.प्रल्हाद चव्हाण, सहाय्यक निबंधक अर्चना माळवे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पारंपारीक पिकांसोबतच शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय केल्यास त्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. शेतकऱ्यांसाठी दुधाळू जनावरे व वैरणाची योजना राबविण्यात येत आहे. या योनजेंतर्गत शेतकऱ्यांना सक्षम कसे करता येईल, यासाठी प्रयत्न व्हावा. शासनाच्या नव्या निर्णयान्वये जिल्ह्यात गायरान, वैरण/ कुरण विकास कार्यक्रम राबविण्यात याव्या. योजनेंतर्गत उत्तम गायरान क्षेत्र निर्माण करा, ईतर जिल्ह्यांसाठी हे क्षेत्र मार्गदर्शक ठरले पाहिजे, असे पाटील म्हणाले.
शेती, शिक्षण आणि आरोग्यावर फार मोठा खर्च होतो. बरेचदा हा खर्च करण्यापलिकडे असतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा या बाबींवर होणार खर्च कमी करणे आवश्यक आहे. कृषि विभागाने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या अनुदानाच्या योजनांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा द्यावा. आरोग्य विभागाने ग्रामस्तरावर आरोग्य शिबिरांचे आयोजन करून शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आरोग्य शिबिरात महिलांना तपासण्यासाठी महिला डॅाक्टरांना उपलब्ध ठेवावे. या शिबिरांची गावस्तरावर प्रचार प्रसिद्धी केली जावी, असे ते म्हणाले.
मिशनच्या पुढाकाराने महाविद्यालय स्तरावर अभ्यासिका सुरु करण्यात आल्या आहे. या अभ्यासिका नियमित सुरु राहतील याकडे लक्ष द्या. नैराश्य आलेल्या शेतकऱ्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी प्रेरणा प्रकल्प राबविण्यात येत आहे, हा प्रकल्प व्यापक प्रमाणावर राबविण्यात यावा. सद्याची पिकपध्दती अतिशय खर्चिक झाली झाली आहे. जैविक पद्धती कमी खर्चाची व फायद्याची असल्याने या पिक पद्धतीला प्रोत्साहन द्या, अधिकाधिक शेतकरी याकडे कसे वळतील, यासाठी प्रयत्न करा.
यावेळी पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती घेतली. शेतकऱ्यांना आपण चांगल्या सेवा कसे देऊ शकू यासाठी सर्वच विभागांनी प्रयत्न केले पाहिजे. शेतकऱ्यांचे जीवनमान सुकर व सुसह्य होण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाच्या कामांची माहिती दिली.