– ढिवर समाज कल्याण संघाच्या वतीने मत्सव्यवसाय मंत्र्यांना तहसीलदारा मार्फत निवेदन
पारशिवनी :- तालुक्यातील नवेगाव खैरी पेंच धरण महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाकडून शासनाच्या मत्सव्यवसाय विभागाकडे हस्तांतरित करणे व अन्य मागणीचे निवेदन महाराष्ट्र ढिवर समाज कल्याण संघाच्या वतीने मत्सव्यवसाय मंत्र्यांना तहसीलदारांमार्फत निवेदन ३0 ऑगस्ट रोजी दिले.
नागपूर जिल्ह्यातील व पारशिवनी तालुक्यातील ढिवर समाजाचा मूळचा व्यवसाय मासेमारी हा असून, पारशिवनी तालुक्यातील मच्छीमार व्यवसाय जलसंपदा विभागाच्या नवेगाव खैरी पेंच जलाशयावर अवलंबून आहे. मागासलेल्या मच्छीमारांना रोजगार मिळणे व त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन अशा मागास समाजाचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दर्जा उंचावणे आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाने मासेमारीसाठी तलाव ठेका धोरण तयार केले. मात्र , तालुक्यातील नवेगाव खैरी पेंच तलाव मासेमारीसाठी महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ मुंबईकडे हस्तांतरित करण्यात आले असून त्यास मासेमारीसाठी तलाव ठेका रक्कम ठरविण्याचे स्वतंत्र अधिकार सुद्धा बहाल केले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नवेगाव खैरी तलावावरील मासेमारीसाठी महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाकडून मनमानी ठेका रक्कम वाढवून लिलाव प्रक्रिया राबविण्यात येते. तलाव ठेका रक्कम एवढी अधिक असते की, तेवढी रक्कम भरण्यासाठी तालुक्यातील एकही मासेमारी संस्था ठेका रक्कम भरावे तेवढय़ा सक्षम नाहीत. त्यामुळे खासगी धनाढय़ लोके संस्था संचालकांशी संपर्क साधून वैयक्तिक आर्थिक व्यवहार करून संस्थेच्या माध्यमातून मासेमारी व्यवसायात खाजगी भागीदार होऊन ठेका रक्कम भरतात.
जे शासकीय तलाव ठेका धोरणापेक्षा खूपच जास्त असून नियमबाह्य असते. यात काही राजकीय नेत्यांची मध्यस्थी दिसून येत असून महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे अधिकारीसुद्धा भागीदार असल्याशिवाय शक्य नाही. अशा लुटमार ठेका लिलाव प्रक्रियामुळे स्थानिक मासेमारी संस्थांचा व स्थानिक मासेमारी करणार्या ढिवर समाजाचा विकास खुंटलेला आहे. ठेका प्रक्रियेत भाग घेण्यासाठी शासन धोरणानुसार अटी शर्ती आहेत. मात्र, अटी व शर्तीचे सर्रास उल्लंघन होत असून याकडे कोणत्याही अधिकारी किंवा नेत्याचे लक्ष नाही.त्यामुळे स्वतंत्र काळापासून मच्छीमार ढिवर समाजाचा विकास खुंटला व मच्छीमार संस्था डबघाईस आलेल्या आहेत. महाराष्ट्र ढिवर समाज कल्याण संघाचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर खंगार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष बाळकृष्णा खंडाटे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देताना उपाध्यक्ष लीलाधर उकेपैठे, प्रभाकर केळवदे, राजू खंडाटे, शेखर केळवदे, देवचंद कामठे, संभा खंडाटे, मुकेश खंडाटे, अंकुश कामठे, मोरेश्वर कुमले, गोलू केळवदे, संजय मेर्शाम, निकेश खंडाटे, राजेश खंडाटे, उमेश केळवदे उपस्थित होते.