नागपूर :-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने ‘अंधार उजळण्यासाठी’ या दोन अंकी नाटकाचा प्रयोग विद्यापीठाच्या गुरूनानक भवनात सादर करण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माननीय प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांनी दीपप्रज्वलन केल्यानंतर नाटकास सुरुवात झाली.
डॉ. पराग घोंगे हे लेखक असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन रमेश लखमापुरे यांनी केले. स्वतः डॉ. पराग घोंगे, दीपलक्ष्मी भट आणि सत्यम निंबुळकर यांनी आपल्या कसदार अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. भाषण व वेशभूषा या साधनांद्वारा केलेली भूमिकेची भावाभिव्यक्ती म्हणजे अभिनय आणि हाच अभिनय जीवनाच्या अंतरंगाशी जेव्हा समरस होतो. तेव्हाच खऱ्या नातेसंबंधांचीही जाणीव होत असते.
हे नाटक पाहताना वि. स. खांडेकरांच्या ‘अमृतवेल’ या कादंबरीतील ‘मनुष्याच्या मनाला कधीच भूतकाळाच्या आठवणींनी जखडून ठेवता येत नाही. ते झेपावत असते भविष्यातील स्वप्नांकडे…. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्यात उतरावं म्हणून प्रयत्न करणं, आणि कधी दुर्दैवाने ते स्वप्न भंग झालं तरी नव्या उमेदीने नवे स्वप्न रंगवणे हा मनुष्याचा स्वभाव… या ओळींचा गर्भितार्थ या नाटकातील अनेक प्रसंगांतून क्षणाक्षणाला जाणवतो.
दीप प्रज्वलनाने प्रारंभ झालेल्या या नाट्यप्रयोगाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभाग प्रमुख डॉ. संयुक्ता थोरात, शताब्दी महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमांचे समन्वयक प्रमोद तिजारे, निलाक्षी सक्सेना आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. नाटकाचे संचालन विजय जेठे यांनी केले.