महावितरणतर्फे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
नागपूर दि .१८ – आझादी का अमृत महोत्सव पॉवर @२०४७ साजरा करण्यासाठी उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य अंतर्गत केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालय व नवीकरणीय मंत्रालयाच्या वतीने दिनांक २५ जुलै ते ३१ जुलै दरम्यान देशातील सर्व जिल्ह्यात विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात केंद्र व राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाच्या वैशिट्यपूर्ण कामगिरीची माहिती विविध माध्यमातून देण्यात येणार आहे.
त्यासाठी महावितरणच्यावतीने नागपूर शहर व ग्रामीण भागात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आर.विमला यांनी आज आयोजित पत्रकार परिषेदेत दिली. पत्रकार परिषदेला मुख्य अभियंता दिलिप दोडके, सेन्टर पॉवर रिसर्च इन्स्टिट्युटचे सहसंचालक राजेश रंजन, या योजनेचे नोडल ऑफिसर शिवराज पडोले उपस्थित होते.
पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रासह केंद्र व राज्य सरकारच्या ऊर्जा क्षेत्रातील मागील ८ वर्षातील उत्कृष्ट कामगिरी बाबत माहिती देणे, विविध योजनेतील लाभार्थ्यांचा सत्कार व त्यांच्याशी सवांद तसेच ऊर्जा क्षेत्रातील आव्हाने व २०४७ पर्यंतचे नियोजन यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात नागपूर जिल्ह्यात नागपूर शहर मंडल कार्यालय अंतर्गत दीक्षाभूमी तर नागपूर ग्रामीण मंडल अंतर्गत वडोदा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत केंद्र व राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाच्या विविध योजनांची माहिती देणारी चित्रफिती,नुक्कड नाटक,प्रदर्शन व पोस्टर्स द्वारे माहिती तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे ३० जुलैला निवडक जिल्ह्यातील लाभधारकांशी संवाद साधणार असून यात महाराष्ट्रातील वर्धा,गडचिरोली,कोल्हापूर,नाशिक व नंदुरबार या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.
या अभियानातील कार्यक्रमांच्या आयोजनाची जबाबदारी संबंधित जिल्ह्यातील महावितरणच्या अधीक्षक अभियंता यांच्याकडे देण्यात आली असून ते या अभियानचे नोडल अधिकारी आहेत. प्रादेशिक संचालक व मुख्य अभियंता हे सनियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. महावितरणच्या वतीने या अभियानात सौभाग्य योजना,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना,सोलर रूफ टॉप योजना,मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, एकात्मिक ऊर्जा विकास योजना,पूर्व विदर्भ योजना, एचव्हीडीएस, इत्यादी योजनांची माहिती तसेच योजनेच्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.