सोलापूर :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि महाराजांच्या नौदलाच्या शक्तीविषयी संपूर्ण जगाला आदर आहे, पण गुलामगिरीच्या मानसिकतेत गुरफटलेल्या काँग्रेसने मात्र, भारतीय नौदलाच्या झेंड्यावरील ब्रिटीशांचे चिन्ह स्वातंत्र्यानंतरही बदलले नाही. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर नौदलाच्या ध्वजावर छत्रपतींचे मानचिन्ह विराजमान झाले. याच काँग्रेसकडून ओबीसी, दलित, आदिवासी समाजाला घटनेने दिलेल्या आरक्षणाला धोका निर्माण केला जातो आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सोलापूर, कराड येथील सभांतून काँग्रेसला पुन्हा लक्ष्य केले.
सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपा – महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी कराड येथे झालेल्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी संरक्षण दलाच्या सामर्थ्याची जाणीव करून देताना, महाराष्ट्र ही शौर्याची, सामाजिक न्यायाची भूमी असल्याचे गौरवोद्गार काढले. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या सुरू असलेल्या अपप्रचाराचाही मोदी यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला. विरोधकांना प्रचारासाठी मुद्दे सापडत नसल्याने आता अपप्रचार सुरू झाला असून सध्या भाजपाच्या अनेक नेत्यांच्या आवाजात, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून बदनामीकारक व खोटी वक्तव्ये प्रसृत केली जात असल्याचे सांगून मोदी यांनी या हीन राजकारणाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अशा अपप्रचारापासून समाजाला वाचविण्यासाठी सावध रहा व असे व्हिडिओ समाजमाध्यमांवर दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्या, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले. या सभेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री शंभूराज देसाई , आ. शिवेंद्रसिंह राजे भोसले, भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आदी उपस्थित होते.
सातारा ही वीरांची भूमी आहे, या भूमीतील जनतेला आज देशाच्या लष्करी शक्तीचा निश्चितच अभिमान वाटत असेल, कारण आता लष्कराकडे मेड इन इंडिया शस्त्रे आहेत. यामुळेच शस्त्रांच्या दलालांची दुकाने बंद झाली असून विरोधकांची हीच पोटदुखी आहे, असेही ते म्हणाले. देशाच्या अभिमानाला, अस्मितेला आणि एकतेला शक्ती देण्याची ग्वाही मी सत्तेवर आलो तेव्हा जनतेला दिली होती, आणि आता ती पूर्ण केली आहे. मोदी सरकारने सैन्यदलात वन रँक वन पेन्शन योजनाही लागू केल्याचा उल्लेखही मोदी यांनी यावेळी केला. महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि ऐतिहासिक ठिकाणांना तसेच देशभरातील सर्व किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा यादीत करण्याचे काम सुरू आहे, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. भारतीय राज्यघटनेने धर्माच्या नावावर आरक्षणास मनाई केली असताना काँग्रेसने मात्र, एका रात्रीत मुस्लिमांचा समावेश ओबीसी यादीत करून त्यांना ओबीसी आरक्षण बहाल केले आणि आता घटनेत बदल करून हीच नीती त्यांना संपूर्ण देशात राबवायची आहे. पण जोवर मोदी जिवंत आहेत, आणि जोवर मोदींना जनतेचा आशीर्वाद आहे, तोवर काँग्रेसचा हा कट यशस्वी होऊ दिला जाणार नाही असा इशारा मोदी यांनी दिला.
त्याआधी सोलापूर मतदारसंघातील भाजपा उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर विजय संकल्प सभेतही मोदी यांनी विकासाच्या मुद्द्यावर भर देत काँग्रेसला झोडपले. या निवडणुकीत जनता पुढच्या पाच वर्षांकरिता विकासाची गॅरंटी निवडणार असून 2014 पूर्वी देशाला भ्रष्टाचार, दहशतवाद आणि कुशासनात लोटणाऱ्यांना नाकारणार आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. असा कलंकित इतिहास असलेली काँग्रेस पुन्हा देशात सत्ता संपादनाची स्वप्ने पाहात असली, तरी जनता त्यांना नाकारणार असून या निवडणुकीत आपला डब्बा गुल झाला आहे याची त्यांना जाणीवदेखील नाही, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेस आघाडीची खिल्ली उडविली. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. सचिन कल्याणशेट्टी , आ. विजय देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. समाधान अवताडे , नरेंद्र काळे आदी उपस्थित होते .
सत्ता मिळाल्यास पाच वर्षांत पाच पंतप्रधान देण्याचा नवा फॉर्म्युला काँग्रेस आघाडीने काढला आहे, या टीकेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. इंडी आघाडीला देश चालवायचा नसून केवळ मलई चाखायची आहे, असा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसची साठ वर्षे जनतेने अनुभवली आहेत, आणि मोदी सरकारची दहा वर्षेदेखील पाहिली आहेत. मागील दहा वर्षांत सामाजिक न्यायासाठी मोदी सरकारने जेवढे काम केले, तेवढे स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या काळात कधीही झाले नाही, त्यामुळे देशातील अनुसूचित जाती-जमाती आणि अन्य मागासवर्गीय समाज त्यांच्या हक्कांपासून वंचित राहिला. मोदी सरकारने ओबीसी समाजाच्या वैधानिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय आयोग नेमला, वैद्यकीय महाविद्यालयांत ओबीसींकरिता आरक्षणाची तरतूद केली आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांकरिता दहा टक्के आरक्षणही लागू केले, असे सांगून, आरक्षण अधिकाधिक मजबूत करण्यासाठी मी बांधील आहे, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. घटना बदलण्याच्या आरोपाचाही मोदी यांनी खरपूस समाचार घेतला. खुद्द बाबासाहेब आंबेडकरांना वाटले असते तरी आज ते घटना बदलू शकले नसते, त्यामुळे मी तर बदलू शकणारच नाही, असा पुनरुच्चारही मोदी यांनी केला.
आपल्या साठ वर्षांच्या सत्ताकाळात देशातील गरीबांचा विकास रोखण्यासाठी काँग्रेसने परोपरीने प्रयत्न केले आणि या वर्गाचा केवळ मतांकरिता वापर करून घेतला, असा आरोपही त्यांनी केला. आता मोदींवर टीका करणे एवढा एक कलमी कार्यक्रम काँग्रेस आघाडी राबवत असून देशाच्या विकासाबाबत या आघाडीकडे मुद्दे नसल्याने मोदींना शिवीगाळ करणे, संविधान बदलणार, आरक्षण हटविणार अशा खोट्या गोष्टी पसरवून जनतेत संभ्रम माजविण्याचे काम इंडी आघाडीकडून सुरू आहे. आमच्या सत्ताकाळात कोठेही खोटेपणाला वाव नव्हता, हे जनतेने अनुभवले आहे, असेही ते म्हणाले.