मुंबई : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील दहेली धरणाचे काम जलदगतीने व्हावे, यासाठी प्राधान्य देण्यात येईल. या कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अक्कलकुवा तालुक्यातील दहेली धरणाचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याबद्दल विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या धरणाची घळभरणी मे 2022 अखेर पूर्ण करण्यात आल्याने प्रकल्पात १०० टक्के जलसाठा निर्माण झालेला आहे. प्रकल्पावर सिंचन क्षमता ३ हजार १६५ हेक्टर प्रस्तावित असून त्याकरिता बंदिस्त नलिकांद्वारे वितरण प्रणाली नियोजित आहे. या प्रकल्पाची कामे जलदगतीने पूर्ण करण्यात येतील, असेही ते म्हणाले.